Asia Cup : टीम इंडियाने आतापर्यंत किती वेळा आशिया कप जिंकला? सर्वात यशस्वी संघ कोणता?

Asia Cup winners Teams : आशिया कप स्पर्धेला केव्हा सुरुवात झाली? स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ कोणता? टीम इंडियाचा कितवा नंबर? जाणून घ्या सर्वकाही.

Asia Cup : टीम इंडियाने आतापर्यंत किती वेळा आशिया कप जिंकला? सर्वात यशस्वी संघ कोणता?
Team India In Asia Cup 2025
Image Credit source: suryakumar yadav x account
| Updated on: Sep 26, 2025 | 9:54 PM

टीम इंडियाने टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियासमोर अंतिम फेरीत कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. उभयसंघातील सामना हा रविवारी 28 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया आतापर्यंत या स्पर्धेत अजिंक्य आहे. तसेच भारत-पाक संघांची अंतिम फेरीनिमित्ताने या स्पर्धेत आमनेसामने येण्याची तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी टीम इंडियाने पाकिस्तानवर साखळी आणि सुपर 4 फेरीत विजय मिळवला.  आता टीम इंडियाकडे अंतिम फेरीत विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा आशिया चॅम्पियन होण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2023 साली श्रीलंकेला पराभूत करत वनडे आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा भारताने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला होता.

आशिया कप स्पर्धेला 41 वर्षांचा इतिहास आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही संघांची अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. याआधी दोन्ही संघ एकदाही या स्पर्धेत अंतिम फेरीत आमनेसामने आले नव्हते. या निमित्ताने आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत किती वेळा विजेतेपद मिळवलं आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ

भारत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने एकूण 8 वेळा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. भारताने 1984 साली पहिलाच आशिया कप जिंकत अप्रतिम सुरुवात केली होती. तसेच टीम इंडिया गतविजेताही आहे. टीम इंडियाने 1984 आणि 2023 व्यतिरिक्त 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 सालीही आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

आतापर्यंत फक्त 3 संघांनाच आशिया कप जिंकता आला आहे. टीम इंडियानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान या 2 संघांनी आशिया कप ट्रॉफी उंचावली आहे. टीम इंडियानंतर श्रीलंका आशिया कप स्पर्धेतील दुसरा यशस्वी संघ आहे. श्रीलंकेने 6 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. तर पाकिस्तानला 2000 आणि 2012 अशा 2 वेळाच चॅम्पियन होता आलं आहे. तर बांगलादेशने 3 वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र त्यांना तिन्ही वेळा पराभूत व्हावं लागलं आहे.

स्पर्धेचा इतिहास

दरम्यान आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याची यंदाची 17 वी वेळ आहे. यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होत आहे. या आधी एकूण 16 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर त्यापैकी 2018 आणि 2022 साली टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. तर 14 वेळा वनडे फॉर्मटने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.