ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन प्रकरणानंतर संतापाची लाट, महानआर्यमन सिंधिया यांच्या तीव्र भावना

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होत आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर इतर सर्व सामना भारतात होणार आहे. पण साखळी फेरीतील ऑस्ट्रेलिया-दक्षिण अफ्रिका सामन्यापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन प्रकरणानंतर संतापाची लाट, महानआर्यमन सिंधिया यांच्या तीव्र भावना
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत गैरवर्तन प्रकरणानंतर संतापाची लाट, महानआर्यमन सिंधिया यांच्या तीव्र भावना
Image Credit source: Pankaj Nangia/Getty Images/Twitter
| Updated on: Oct 25, 2025 | 8:31 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. पण या स्पर्धेचा शेवट गोड होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन महिला संघासोबत इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंवर एका दुचाकीस्वाराने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ऑस्ट्रेलियन खेळाडू हॉटेल रेडिसन ब्लू येथून खजराना रोडवरील एका कॅफेकडे जात असताना हा प्रकार घडला. एका व्यक्तीने त्यांचा पाठलाग केला आणि संधी साधून विनयभंग करून पळून गेला. या घटनेनंतर दोन्ही खेळाडू घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती संघाच्या सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांना दिली. घटनेची माहिती समोर येताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना बेड्याही ठोकल्या आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ही घटना देशासाठी लज्जास्पद असल्याचं म्हंटलं आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनीही या घटनेप्रकरणी परखड भावना व्यक्त केल्या आहेत.

महानआर्यमन सिंधिया यांनी ट्वीट करत लिहिलं की, ‘इंदुरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंसोबत गैरवर्तन झाल्याच्या घटनेने मन अत्यंत व्यथित, स्तब्ध आणि दुखी झालं आहे. कोणत्याही महिलेला असे गैरवर्तन सहन करावे लागू नये. आम्ही पीडित खेळाडूंबद्दल आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. ही घटना केवळ खेळाडूंसाठीच नाही तर संपूर्ण क्रीडा समुदायासाठी तसेच आपल्या राज्यासाठी आणि शहरासाठी खूप वेदनादायक आहे. मध्य प्रदेश, विशेषतः इंदूर, नेहमीच आपल्या पाहुण्यांच्या आदर आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध आहे. एका व्यक्तीच्या अनुचित वर्तनाने या प्रतिष्ठित प्रतिमेला कलंकित केले आहे, ज्यामुळे आपण सर्वांना खूप दुःख झाले आहे. ‘

या घटनेनंतर पोलिसांनी सहा तासांच्या आत आरोपीला अटक केली. महानआर्यमन सिंधिया यांनी आरोपींना तात्काळ अटक केल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचं कौतुकही केलं आहे. ‘स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी आरोपींना तातडीने ओळखून अटक केलेल्या जलद आणि कठोर कारवाईचे आम्ही कौतुक करतो. या कठीण काळात एमपीसीए पीडित खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन संघासोबत आहे आणि तपास संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत.’, असंही त्यांनी पुढे ट्वीट करत सांगितलं.