
मुंबई : सरफराज खान याचा छोटा भाऊ मुशीर खान हा देखील जबरदस्त फॉर्मात आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेनंतर मुशीर खान मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे. रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई विरुद्ध बरोडा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात मुशीर खानची बॅट चांगलीच तळपली. त्याने द्विशतक ठोकत मुंबई संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. मुशीर खानने 350 चेंडूचा सामना केला आणि 18 चौकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केलं. संघाची गरज पाहता शॉट हवेत खेळण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच चौकार ठोकत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. मुशीर खानचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वात मोठा स्कोअर आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर चौथ्या सामन्यातच मोठं यश संपादन केलं आहे. यापूर्वी त्याने तीन फर्स्ट क्लास सामन्यात 96 धावा केल्या होत्या. द्विशतक ठोकत 18 वर्षे आणि 362 दिवसांचा असलेल्या मुशीर रणजी ट्रॉफीत अशी कामगिरी करणारा दुसरा युवा फलंदाज आहे. यापूर्वी हा विक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे. त्याने 18 वर्षे आणि 262 दिवासांचा असतान द्विशतक ठोकलं आहे.
रणजी स्पर्धेतील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मुंबई आणि बरोडा संघात सुरु आहे. मुंबईच्या होम ग्राउंडवर हा सामना होत आहे. मुंबईचा निम्मा संघ तंबूत परतला असताना मोठ्या खेळीची आवश्यकता होती. अशावेळी मुशीर खान उभा राहिला आणि मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. मुंबईची स्थिती 142 धावांवर पाच अशी असताना मुशीर खानने 203 धावांची खेळी करत धावसंख्या 384 पर्यंत पोहोचवली आहे.
पृथ्वी शॉ 33, भुपेन ललवानी 19, मुशीर खान नाबाद 203, अजिंक्य रहाणे 3, शम्स मुलानी 6, सुर्यांश शेडगे 20, हार्दिक टामोरे 57, शार्दुल ठाकुर 17, तनुश कोटियन 7, मोहित अवस्थी 2 आणि तुषार देशपांडे शून्यावर बाद झाला. बरोड्याकडून भार्गव भट्टने सर्वाधिक 7 गडी बाद केले. तर निनाद रथ्वाने 3 गडी बाद केले.
मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भुपेन ललवानी, मुशीर खान, शम्स मुलानी, सुर्यांश शेडगे, हार्दिक टामोरे, शार्दुल ठाकुर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे
बरोडा : ज्योत्सनिल सिंग, प्रियांशु मोलिया, शशवत रावत, भार्गव भट्ट, लुकमन मेरिवाला, महेश पिठिया, मिथेश पटेल, विष्णु सोलंकी (कर्णधार), निनाद रथ्वा, राज लिंबानी, शिवालिक शर्मा