WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात नो एंट्री, नेमक काय घडलं?

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. कोण बाद फेरीत जागा मिळवणार याची उत्सुकता आहे. या सामन्यांसाठी प्रेक्षकही मैदानात हजेरी लावत आहे. पण दोन दिवस प्रेक्षकांना नो एन्ट्री असणार आहे.

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात नो एंट्री, नेमक काय घडलं?
WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात नो एंट्री, नेमक काय घडलं?
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 12, 2026 | 9:09 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यांतर रंगतदार वळणावर जात आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामने हे नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होत आहे. या मैदानात एकूण 11 सामने पार पडणार आहेत. हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने मैदानात हजेरी लावत आहेत. मैदानातील प्रेक्षकांची गर्दी पाहता बीसीसीआयच्या आनंदाला पारावर उरला नाही. वुमन्स वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. पण बीसीसीआयच्या या आनंदावर काही अंशी विरजन पडलं आहे. कारण या स्पर्धेच्या दोन सामन्यात प्रेक्षकांना मैदानात हजेरी लावता येणार नाही. त्याला कारणही तसंच आहे. मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. पोलीस यंत्रणेवरील ताण पाहता हा निर्णय घेतला गेला आहे.

स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, मुंबई आणि नवी मुंबईत 15 जानेवारीला मतदान होणार आहे. पण 14 जानेवारी आणि 15 जानेवारीला मैदानात प्रेक्षकांना हजेरी लावता येणार नाही. बीसीसीआयला दोन सामने प्रेक्षकांविना आयोजित करावे लागणार आहेत. कारण 14 जानेवारी आणि 15 जानेवारीला महाराष्ट्र पोलिसांवर निवडणुकांची जबाबदारी असणार आहे. ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामी लागणार आहे. अशा स्थितीत स्टेडियमबाहेर पोलीस सुरक्षा पुरवणं कठीण होणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांसाठी प्रेक्षकांना मैदानात येता येणार नाही. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, बोर्डाला पोलिसांनी सांगितलं की या दोन दिवशी सुरक्षा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे 14 आणि 15 जानेवारीला सामने प्रेक्षकांविना आयोजित करावे लागण्याची शक्यता आहे.

16 जानेवारीलाही प्रेक्षकांविना सामना आयोजित करावा लागू शकतो. कारण या दिवशी मतमोजणी होणार आहे. पण याबाबत सध्या काहीच चर्चा नाही. दरम्यान, देवजीत सैकिया यांनी पुढे स्पष्ट केलं की, अजून याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. 14 जानेवारील डीवाय पाटील स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स सामना होईल. तर 15 जानेवारीला मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात लढत होईल. पण या सामन्यांसाठी प्रेक्षकांना नो एन्ट्री असेल तर बीसीसीआयच्या कमाईवर प्रभाव दिसून येईल. कारण तिकीट विक्रीतून होणारी कमाई गमवावी लागेल.