
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. उभयसंघातील हा सामना रविवारी 8 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. ऑलराउंडर राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल सँटनर याच्या खांद्यावर न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. न्यूझीलंडला या सामन्यात विजयी सुरुवात करुन खास कामगिरी करण्याची संधी आहे. मात्र ट्रॅक रेकॉर्ड पाहता न्यूझीलंडसाठी ते सोपं नाहीय.
न्यूझीलंडकडे या सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानचा हिशोब चुकता करण्याची सुवर्ण संधी आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर गेल्या टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडकडे 2 वर्षांनी या सामन्यानिमित्ताने पराभवाची वसुली करण्याची नामी संधी आहे. मात्र अफगाणिस्तान न्यूझीलंडला सहजासहजी हा सामना जिंकून देणार नाही. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना रविवारी 8 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.
न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅच हॉटस्टार एपद्वारे पाहता येईल.
गयानामधील प्रोव्हीडेन्स स्टेडियममध्ये गेल्या टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीत अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता. उभयसंघात 7 जून रोजी हा सामना खेळवण्यात आला होता. अफगाणिस्तानने या सामन्यात पहिले बॅटिंग करताना न्यूझीलंडसमोर सन्मानजनक आव्हान ठेवलं होतं. अफगाणिस्तानने 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने त्यानंतर 160 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 28 बॉलआधीच गुंडाळून सामना जिंकला होता. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला 15.2 ओव्हरमध्ये 75 रन्सवर गुंडाळलं होतं. अफगाणिस्तानने अशाप्रकारे 84 धावांनी सामना जिंकला होता. आता न्यूझीलंड या पराभवाची परतफेड करत वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.