ODI WC 2027: वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीचा खास मुहूर्त, महात्मा गांधींना वाहणार श्रद्धांजली!
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाटी आयसीसीने एक खास प्लान आखला आहे. या स्पर्धेच्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. पण महात्मा गांधी यांचं जीवन आणि दक्षिण अफ्रिकेतील इतिहास पाहता या स्पर्धेसाठी एक खास तारीख निवडली आहे.

ODI World Cup 2027: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होत आहे. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेसाठी मुहूर्तासाठी 8 ऑक्टोबर तारीख असू शकते अशी चर्चा होती. त्यात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान सराव सामन्यांची मेजवानी असणार होती. पण आता आयसीसी आपल्या प्लानमध्ये एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही स्पर्धा ठरलेल्या तारखेच्या आधीच सुरू होण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून सुरूवात करण्याची शक्यता आहे. आयसीसी शांती आणि अहिंसेचं प्रतीक असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जीवन आणि दक्षिण अफ्रिकेतील त्याच्या 21 वर्षांचा ऐतिहासिक संदर्भाला उजाळा देण्याच्या तयारीत आहे. यासाठी ही स्पर्धा 2 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा विचार आहे.
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तारीख काय असेल?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 21 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळला जाण्याची शक्यता आहेत. या स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार असून ही स्पर्धा जवळपास 50 दिवस चालणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत दहा संघांनी पात्रता मिळवली आहे. यात यजमान दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वेसह भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्ता संघाचा भाग आहे. तर उर्वरित चार संघांची निवड पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या 10 संघाच्या पात्रता फेरीतून होईल. यातून वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि नामिबिया संघ पात्र ठरण्याची शक्यता आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी नवा फॉर्मेट
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत नवा फॉर्मेट असणार आहे. या स्पर्धेत सुपर सीरिज फेरीचा समावेश केला आहे. या नियमानुसार 12व्या, 13व्या आणि 14व्या संघात एक ट्राय सीरिज होईल. त्यातून एक संघ वर्ल्डकपच्या मुख्य स्पर्धेत भाग घेईल. त्यानंतर 12 संघ 6-6च्या दोन गटात विभागले जातील. यातून सुपर 7 संघ पुढच्या फेरीत खेळतील. त्यातून टॉप 4 संघांची उपांत्य फेरीत निवड होणार आहे. आयसीसी स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियातील 12 शहरात होणार आहे. दक्षिण अफ्रिकेतील 8 ठिकाणं, झिम्बाब्वेतील 3 ठिकाणं आणि नामिबियातील एक ठिकण असेल.