लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 मध्ये फक्त सहा संघांना परवानगी, पाकिस्तानची चिंता वाढली
वर्ल्डकप इतकंच महत्त्व ऑलिंपिक स्पर्धेला आहे. दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यासाठी खेळाडू मेहनत घेत असतात. आता ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटची एन्ट्री झाली आहे. 2028 या वर्षात लॉस एंजेलिस येथे ही स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेत फक्त सहा संघांची निवड केली जाणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणे ऑलिंपिक स्पर्धेत जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून खेळाडू आणि संघ मैदानात उतरत असतात. दर चार वर्षांनी भरणाऱ्या खेळाच्या कुंभमेळ्यात सुवर्ण पदकासाठी चढाओढ पाहायला मिळते. खेळ कुंभमेळ्यात आता क्रिकेटची एन्ट्री झाली आहे.लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत टी20 फॉर्मेटमध्ये क्रिकेट स्पर्धा भरवली जाणार आहे. पण या स्पर्धेसाठी फक्त सहा संघांची निवड केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने स्पष्ट केलं की, ऑलिंपिक खेळांच्या 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच क्रिकेटची ओळख करून दिली जाणार आहे. यात पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी सहा संघ असतील. आयसीसी टी20 संघ क्रमवारीच्या आधारे पात्र ठरतील. म्हणजेच ऑलिंपिक पात्रतेच्या वेळी आयसीसी संघ क्रमवारीचा विचार करून 6 संघांची निवड केली जाईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात 12 पूर्ण सदस्यीय संघांची यादी ऑलिंपिक समितीकडे पाठवेल. या यादीत संघांच्या क्रमवारीच्या आधारे सहा संघ ऑलिंपिक स्पर्धेत खेळवले जातील. पुढील दोन वर्षांत एखाद्या सहकारी सदस्य देशाचा कोणताही संघ आयसीसी टी२० संघ क्रमवारीत टॉप-6 मध्ये आला तर तो संघ पात्र ठरेल.भारत सध्या टी20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे.
पाकिस्तान संघ सातव्या स्थानावर आहे. याचा अर्थ असा की फक्त अव्वल 6 संघच ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील. जर पुढील वर्षभरात पाकिस्तानी संघ टॉप 6 मध्ये आला नाही तर तो ऑलिंपिकमधून निश्चितच बाहेर पडेल. त्यामुळे आगामी टी20 मालिका पाकिस्तान संघासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
