AFG vs PAK 1st Odi | हरीस रौफ यांचा अफगाणिस्तानला ‘पंच’, पाकिस्तानचा 142 धावांनी दणदणीत विजय

Pakistan vs Afghanistan 1st Odi | पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत 142 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे.

AFG vs PAK 1st Odi | हरीस रौफ यांचा अफगाणिस्तानला पंच, पाकिस्तानचा 142 धावांनी दणदणीत विजय
| Updated on: Aug 22, 2023 | 9:39 PM

हंबनटोटा | पाकिस्तान क्रिकेट टीमने अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विजय सलामी दिली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 202 धावांचा शानदार बचाव करत अफगाणिस्तानचा बाजार उठवला. पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानचं 19.2 ओव्हरमध्ये 59 धावांवर पॅकअप झालं.

पाकिस्तानने अफगाणिस्तानला सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. पाक गोलंदाज अफगाणिस्तानला ऑलआऊट करुनच थांबले. अफगाणिस्तानकडून चौघांना भोपळाही फोडता आला नाही. एक झिरोवर नाबाद परतला. चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर रहमालुल्लाह गुरुबाज याने सर्वाधिक 18 धावा केल्या. तर अजम्तुल्लाह ओमरझाई हा 16 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला.

हरीस रौफ याच्याकडून अफगाणिस्तानचा ‘पंचनामा’

पाकिस्तानकडून हरीस रौफ याने अफगाणिस्तानचा पंचनामा केला. हरीसने अफगाणिस्तानच्या 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हरीसने अवघ्या 6.2 ओव्हरमध्ये अवघ्या 18 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. शाहिन अफ्रिदी याने सलग 2 बॉलवर 2 विकेट्स घेत चांगली सुरुवात करुन दिली. याचाच फायदा हा हरीस रौफ याने घेत अफगाणिस्तानची कंबर मोडली. तर नसीम शाह आणि शादाब खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

पाकिस्तानची बॅटिंग

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून इमाम उल हक याने सर्वाधिक 61 रन्स केल्या. शादाब खान याने 39 आणि इफ्तिखार अहमद याने 30 रन्स केल्या. रिझवान याने 21 आणि नसीम शाह याने 18 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही.

अफगाणिस्तानकडून मुजीब याने 3, नबी आणि राशिद खान या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रहमत आणि फारुकी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना हा 24 ऑगस्टला होणार आहे.

अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, अब्दुल रहमान, मुजीब उर रहमान आणि फजलहक फारुकी.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.