PAK vs ENG : दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानच्या प्लेइंग 11 ची घोषणा, बाबरच्या जागी 1 सामना खेळलेला खेळाडू

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून 4 बदल केले आहेत. बाबर आझमच्या जागी फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या खेळाडूला संधी मिळाली आहे.

PAK vs ENG : दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानच्या प्लेइंग 11 ची घोषणा, बाबरच्या जागी 1 सामना खेळलेला खेळाडू
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 14, 2024 | 5:03 PM

कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानची गेल्या काही महिन्यांपासून नाचक्की सुरु आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर विजय मिळवणं कठीण जात असल्याचं दिसत आहे. बांगलादेशनेच कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर इंग्लंडने तोच कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव 47 धावांनी विजय मिळवला. तसेच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात बरीच उलथापालथ दिसत आहे. पाकिस्तानने आपल्या संघात काही बदल केले आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आमि सरफराज अहमद यांना संघातून डच्चू दिला आहे. त्याचा प्रभाव प्लेइंग इलेव्हनवर दिसत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. यात काही नव्या खेळाडूंची एन्ट्री झालीआहे. संघात एकूण 4 बदल झाल्याचं दिसत आहे. बाबर आझमची जागा एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या खेळाडूने घेतली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबर आझमची जागा कामरान गुलामने घेतली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त एक वनडे सामना खेळला आहे. त्यामुळे या सामन्यातून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत पदार्पण करणार आहे. गोलंदाज शाहीन आफ्रिदीची जागा नोमान अली ने घेतली आहे. तसेच साजिद खान आणि जाहिद मेहमूद यांनाही प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली आहे. हे दोघंही फिरकीपटू आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असेल असं दिसत आहे. तर पहिल्या सामन्यात असलेले सइम अयूब, अब्दुल्लाह शफीक, शान मसूद, सउद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा आणि अमीर जमला दुसऱ्या कसोटीतही असणार आहेत.

दुसरीकडे, इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल करण्यात आला आहे. संघात कर्णधार बेन स्टोक्सचं कमबॅक झालं आहे. तर मॅथ्यू पॉट्सला संघात स्थान मिळालं आहे. या दोघांनी गस एटकिंसन आणि ख्रिस वोक्स यांची जागा घेतली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तान प्लेइंग 11 : सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सउद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद मेहमूद.

इंग्लंड प्लेइंग 11 : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर.