PAK vs IND | कुलदीप यादव याचा ‘पंच’, टीम इंडियाचा पाकिस्तानवर 228 धावांनी ऐतिहासिक विजय
Pakistan vs India Asia Cup 2023 Super 4 | टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत सुपर 4 मध्ये शानदार सुरुवात केली आहे.

कोलंबो | अखेर अनेक विघ्नानंतर पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याच्या निकाल लागला आहे. टीम इंडियाने आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामना राखीव दिवशी तब्बल 228 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र कुलदीप यादव याच्या फिरकीसमोर पाकिस्तानचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. कुलदीपने फहीम अश्रफ याला आऊट करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. यामुळे पाकिस्तानची 32 ओव्हरमध्ये 8 बाद 128 अशी स्थिती झाली. त्यानंतर नसीम शाह आणि हरीस रौफ या दोघांची बॅटिंगला येण्याची वेळ होती. मात्र दोघेही दुखापतीमुळे बॅटिंग करण्यास अक्षम होते. त्यामुळे इथेच सामना टीम इंडियाने जिंकल्याची घोषणा करण्यात आली.
कुलदीप यादवकडून पाकिस्तानचा ‘पंच’नामा
टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला विशेष काहीच करता आलं नाही. ओपनर फखर झमान याने सर्वाधिक 27 धावा केल्या. आघा सलमान आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन बाबर आझम याने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून चायनमन बॉलर कुलदीप यादव याने दुसऱ्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा धमाकेदार विजय
An extraordinary batting display, a perfect bowling plan, and centuries by @imVkohli and @klrahul! 🏏🙌 Hats off to Virat and @imkuldeep18 for their brilliance. Rahul’s and @Jaspritbumrah93‘s remarkable comebacks after injury. This match was truly unforgettable. 🇮🇳👏 #INDvsPAK… pic.twitter.com/fr94mNb9dW
— Jay Shah (@JayShah) September 11, 2023
राखीव दिवसाला सुरुवात
त्याआधी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राखीव दिवसाचा खेळाला दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. टीम इंडियाच्या केएल राहुल आणि विराट कोहली यांनी मुख्य दिवशी खेळ जिथे थांबला तिथून म्हणजेच 24.1 ओव्हर 147- 2 या धावसंख्येपासून सुरुवात केली. या दोघांनी अशी बॅटिंग केली की इतरांना संधी दिलीच नाही. या दोघांनी 50 ओव्हरपर्यंत 195 बॉलमध्ये 233 धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला 357 धावांपर्यंत पोहचवलं.
टीम इंडियाकडून विराट कोहली याने 94 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 122 धावा केल्या. तर केएल राहुल याने 6 महिन्यांनी दमदार कमबॅक केलं. केएलने 106 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 111 धावांची नाबाद खेळी केली. तर त्याआधी मुख्य दिवशी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 103 बॉलमध्ये 121 पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर दोघेही सलग 2 ओव्हरमध्ये आऊट झाले. रोहितने 56 आणि शुबमनने 58 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.
