Wtc : आशिया कप फायनलनंतर टेस्ट सीरिजसाठी टीम जाहीर, दोघांचा पत्ता कट, अनुभवी जोडीचं कमबॅक

Test Cricket : आशिया कप 2025 फायनलनंतर होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 12 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.

Wtc : आशिया कप फायनलनंतर टेस्ट सीरिजसाठी टीम जाहीर, दोघांचा पत्ता कट, अनुभवी जोडीचं कमबॅक
IND vs PAK Asia Cup 2025 Final
Image Credit source: ACC
| Updated on: Sep 30, 2025 | 10:04 PM

टीम इंडियाने रविवारी 28 सप्टेंबरला पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत करत दुबईत आशिया कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने पाकिस्तानवर अंतिम सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताने यासह कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि नवव्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. टीम इंडियाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा आपलाच रेकॉर्ड आणखी मजबूत केला. आशिया कप स्पर्धेनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध 2 ऑक्टोबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर उपविजेता पाकिस्तान क्रिकेट टीमही आशिया कप स्पर्धेनंतर टेस्ट सीरिज खेळणार आहे.

पाकिस्तान मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 ते 24 ऑक्टोबर दरम्यान 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पीसीबीने या मालिकेसाठी मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.शान मसूद दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच आशिया कप स्पर्धेतील 2 खेळाडूंना या मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही. निवड समितीने युवा फलंदाज सॅम अयुब आणि वेगवान गोलंदाज हारीस रौफ या दोघांचा पत्ता कट केला आहे. तसेच वेगवान गोलंदाज नसीम शाह याला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नसीमला कमबॅकसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर अनुभवी जोडीचं या मालिकेतून पुन्हा एकदा संघात कमबॅक झालं आहे. निवड समितीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीचा मालिकेसाठी संघात समावेश केला आहे.

तिघांना पहिल्यांदाच संधी

तसेच निवड समितीने कसोटी संघात पहिल्यांदाच 3 खेळाडूंना संधी दिली आहे. या तिघांमध्ये आसिफ अफ्रीदी, फैजल अकरम आणि रोहैल नजीर यांचा समावेश आहे. या तिघांना कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 12 ते 16 ऑक्टोबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

दुसरा सामना, 20 ते 24 ऑक्टोबर, रावळपिंडी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आसिफ आफ्रिदी, बाबर आझम, फैसल अक्रम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान, नोमान अली, रोहेल नजीर, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील शाह आणि सऊद शकील.