
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजांची नाच्चकी झाली. कॅनडा विरुद्धच्या सामन्यातही पाकिस्तानी गोलंदाजांना कठीण परीक्षेतून जावं लागलं. एकीकडे खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असूनही कॅनडाने 7 गडी गमवून 106 धावांपर्यंत मजल मारली. कॅनडाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात आरॉनने पाकिस्तानी गोलंदाजांचा दम काढला. पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीला बॅकफूटवर ढकललं. पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारून आपला हेतू स्पष्ट केला होता. त्याची झलक पुढे दिसून आली. आरॉनने 44 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. त्याला बाद करताना पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच दम निघाला. एकीकडे विकेट पडत असताना दुसरीकडे आरॉनने मोर्चा सांभाळला होता. अखेर 14 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नसीम शाहने त्याचा त्रिफळा उडवला आणि तंबूचा रस्ता दाखवला. पण तिथपर्यत त्याने संघासाठी भूमिका बजावली होती.
आरॉन जॉन्सनने सांगितलं की, “माझी मानसिकता संघाला चांगली सुरुवात करून देणे आणि सकारात्मक असणे गरजेचं होतं. संघाने मला पाठिंबा दिला आहे, प्रशिक्षकाने मला सांगितले आहे की, चेंडू व्यवस्थित बघ आणि मारा कर. माझी कॅरिबियन पार्श्वभूमी आहे आणि मी तिथे वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. माझे सहकारी मला वेगवान गोलंदाजीला सामोरं जाण्यास सांगतात.” जॉन्सन वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.