
टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. त्यामुळे रविवारी रात्रीच पाकिस्तानात दिवाळी साजरी करण्यात आली. लोक रस्त्यांवर उतरुन जल्लोष करत असल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी पोलिसांनी फायरींग करुन जल्लोष साजरा केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि 1992 चा विश्वचषक विजेते माजी कर्णधार इम्रान खान यांनीही पाकिस्तानच्या विजयानंतर ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आझमचे अभिनंदन ज्याने उत्कृष्ट नेतृत्व केले. रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही चमकदार कामगिरी केली. देशाला तुमचा अभिमान आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'अलहमदुलिल्लाह. हा पहिला विजय आहे आणि सर्वात संस्मरणीय देखील आहे. पाकिस्तानी लोकांसाठी अभिमानाचा क्षण आहे, ज्यासाठी संपूर्ण टीमचे आभार. ही एक संस्मरणीय प्रवासाची सुरुवात आहे. रमीझ राजा नुकतेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झाले आहेत.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध बंद आहेत. पाकिस्तानने 2012 मध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता, परंतु दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात फारच कमी स्पर्धा पाहायला मिळाल्या आहेत.

पाकिस्तानात अनेक ठिकाणी लोकांनी रात्री रस्त्यांवर येऊन जल्लोष केला, अनेक ठिकाणी लोक नाचत गात होते.