
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं काही भारताला जमलं नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावल्याने फटका बसला. तसेच अंतिम फेरी तिसऱ्यांदा गाठण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला फटका बसला आहे. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात पॅट कमिन्स याने 6 विकेट घेतल्या. यासह त्याने 2023-2025 जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी पहिल्या स्थानावर जसप्रीत बुमराह होता. मात्र त्याला आता दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. पॅट कमिन्सने 18 सामन्यात 79 विकेट घेत पहिलं स्थान गाठलं आहे. आता दुसऱ्या डावात यात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने 15 सामन्यात 77 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 32 विकेट घेतल्या होत्या. त्याने 13.06 च्या सरासरीने विकेट घेतल्या होत्या. मालिका गमावली असली तरी जसप्रीत बुमराहला प्लेयर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 या पर्वात सर्वाधिक विकेट घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराहसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दुसऱ्या डावात 2 विकेट घेतल्या आणि 77 विकेटचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आणखी काही विकेट मिळाल्या तर बुमराहच्या पुढे निघून जाईल. चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायन आहे. त्याने 17 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही गोलंदाजांच्या विकेटमध्ये आणखी भर पडेल यात काही शंका नाही. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतलेला भारताचा फिरकीपटू आर अश्विन 14 सामन्यात 63 विकेट घेत पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका अंतिम सामना निर्णायक वळणावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर आटोपला. या डावात मिचेल स्टार्कने नाबाद 58 धावांची खेळी केली. पहिल्या डावात 74 धावांची आघाडी मिळाली होती. यासह ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने दोन विकेट गमावल्या आहेत. अजूनही खेळ असून दोन्ही बाजूंना विजयाची तितकीच संधी आहे.