
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.त्याआधी दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून देशातंर्गत क्रिकेट हंगामाचा थरार रंगणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. तर दुलीप ट्रॉफीआधी बहुप्रतिक्षित बुची बाबू स्पर्धेचा 18 ऑगस्टपासून श्रीगणेशा होणार आहे.या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या काही तासांआधी पंजाब क्रिकेट असोसिएशनने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बुची बाबू स्पर्धेत अनमोलप्रीत सिंह याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आयपीएल आणि इतर स्पर्धेत खेळण्याऱ्या खेळाडूंचा पंजाब संघात समावेश करण्यात आला आहे. प्रभसिमरन सिंह, रमनदीप सिंह आणि उदय सहारन यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आयपीएलच्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अश्वनी कुमार यालाही संधी मिळाली आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या खेळाडूंवरही पीसीबीच्या निवड समितीने विश्वास दाखवला आहे.
बुची बाबू 2025 स्पर्धेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 9 सप्टेंबरला विजेता संघ निश्चित होईल. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. कोणते संघ कोणत्या गटात आहेत? हे जाणून घेऊयात.
अ गट : टीएनसीए प्रेसिडेंट ईलेव्हन, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र
ब गट : रेल्वे, जम्मू आणि काश्मीर, बडोदे आणि ओडीशा
क गट : टीएनसीए ईलेव्हन, मुंबई, हरयाणा आणि बंगाल
ड गट : हैदराबाद, पंजाब, मध्य प्रदेश आणि झारखंड
बुची बाबू 2025 स्पर्धेसाठी पंजाब टीम : अनमोलप्रीत सिंह (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, जसकरणवीर सिंह पॉल, गुरुनूर सिंह ब्रार, हरनूर सिंह पन्नू, प्रेरीत दत्ता, उदय प्रताप सहारन,सलील अरोरा, आराध्य शुक्ला, रघु शिवम शर्मा, पुखराज मन, रमनदीप सिंह, जस इंदर सिंह, अश्वनी कुमार,क्रिष भगत आणि अनमोल मल्होत्रा.
दरम्यान देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळणारा माजी खेळाडू पृथ्वी शॉ नव्या संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पृथ्वी शॉ बुची बाबू स्पर्धेतून महाराष्ट्रकडून पदार्पण करणार आहे. अंकीत बावणे या स्पर्धेत महाराष्ट्रचं नेतृत्व करणार आहे. तसेच महाराष्ट्र संघात स्टार बॅट्समन आणि विकेटकीपर ऋतुराज गायकवाड याचाही समावेश आहे.