
आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने आले होते. भारताने स्पर्धेत आधीच पाकिस्तानला धोबीपछाड दिला होता. तिसऱ्यांदा तशाच कामगिरीची अपेक्षा होती. झालंही तसंच.. भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून धुव्वा उडवला. खरं तर हा विजय काही सोपा नव्हता. भारताच्या हातून हा सामना निसटतो की काय असं वाटत होतं. पण तिलक वर्माने विजयी खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. खरं तर हा सामना गमावला असता तर स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्व कामगिरीवर पाणी पडलं असतं. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व अधिक होतं. पॉवर प्लेमध्ये तीन विकेट झटपट गेल्यानंतरही भारतीय संघ डगमगला नाही. तसेच विजयश्री खेचून आणला. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला क्रिकेट संघाचा अभिमान आहे. भारताने विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत अभिनंदन केलं. त्यांनी टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, ‘खेळाच्या मैदानात ऑपरेशन सिंदूर, तोच निकाल.. भारताचा विजय. आमच्या क्रिकेपटूंना शुभेच्छा.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देताच ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. इतकंच काय तर 1 लाख 70 हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. तर या पोस्टवर 2 कोटी 50 लाखाहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या टीम इंडियावर केलेल्या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर बहुतांश लोकांनी भारत प्रत्येक आघाडीवर पुढे आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same – India wins!
Congrats to our cricketers.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आभार व्यक्त केले आहेत. त्याने त्याच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टचं विश्लेषण केलं. सूर्यकुमार यादव एएनआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना म्हणाला की, ‘देशाचा नेता स्वतः फ्रंटफूटवर फलंदाजी करतो तेव्हा खूप छान वाटते. जणू काही त्यांनी स्वतः स्ट्राईक घेतला आहे आणि धावा काढत आहेत असे वाटते. जेव्हा सर समोर उभे असतात तेव्हा खेळाडू मोकळेपणाने खेळतील. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे. जेव्हा आम्ही भारतात जाऊ तेव्हा खूप छान वाटेल. आपल्याला चांगले काम करण्याची अधिक प्रेरणा मिळेल.’