1996 चा वनडे वर्ल्डकप विजयी श्रीलंकन संघासोबत पंतप्रधान मोदींनी केली चर्चा, जयसूर्या म्हणाला…

वनडे क्रिकेटमध्ये एक काळ असा होती की, श्रीलंकेचा दबदबा होता. 1996 पासून श्रीलंकेने क्रिकेटचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. 1996 मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. या विजयी संघाची जवळपास 30 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट झाली. दिग्गज खेळाडूंनी मोदींचं कुशल नेतृत्व आणि भारताच्या प्रगतीची स्तुती केली.

1996 चा वनडे वर्ल्डकप विजयी श्रीलंकन संघासोबत पंतप्रधान मोदींनी केली चर्चा, जयसूर्या म्हणाला...
Image Credit source: Narendra Modi Twitter
| Updated on: Apr 05, 2025 | 10:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या भेटीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा केली.श्रीलंकेने पंतप्रधान मोदींना ‘मित्र विभूषण’ देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान स्वीकारताना सांगितलं की, 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान आहे. 2014 नंतरचा हा त्यांचा श्रीलंकेचा चौथा दौरा आहे. दुसरीकडे, 1996 वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंचीही भेट घेतली. यावेळी सनथ जयसूर्या, अरविंदा डी सिल्वा, चामिंडा वास, अटापट्टूसह इतर खेळाडू होते. दिग्गज खेळाडूंची भेट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी लिहिलं की, ‘1996 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाच्या सदस्यांना भेटून आनंद झाला. हा असा संघ आहे ज्याने केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर जगभरातील लाखो क्रीडाप्रेमींच्या कल्पनाशक्तीलाही जिवंत केले.’ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या, रोमेश कालुविथरना आणि अरविंद डीसिल्वा यांनीही प्रतिक्रिया दिल्या.

अरविंद डी सिल्वा यांनी सांगितलं की, ‘जग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करते. त्याने आपल्या भारत देशासाठी खूप काही केले आहे. इतक्या मोठ्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे ही एक मोठी उपलब्धी आहे.’

सनथ जयसूर्या याने सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे हा एक अद्भुत अनुभव होता. त्यांनी भारत एक राष्ट्र म्हणून कसा विकसित झाला आहे हे स्पष्ट केले. आम्ही इतर अनेक गोष्टींबद्दल आणि क्रिकेटबद्दलही बोललो. त्यांनी भारतात सत्ता कशी हाती घेतली आणि देशाचा विकास कसा केला याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोललो.’

रोमेश कालुविथरणा याने सांगितलं की, ‘नरेंद्र मोदी भारतात सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. भारताच्या पंतप्रधानांनीही श्रीलंकेसाठी खूप काही केले आहे. संकटाच्या काळात भारत नेहमीच श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आहे.’