Pahalgam : पहलगाम प्रकरणानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका, PSL च्या प्रसारणावर बंदी

PSL Streaming Stop Pahelgam Terrorist Attack : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचं ठरवलं आहे. या दहशतवादी हल्ल्यांनतर भारतात पीएसएलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.

Pahalgam : पहलगाम प्रकरणानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका, PSL च्या प्रसारणावर बंदी
PSL 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 24, 2025 | 5:14 PM

पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. या दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्या, त्याना ठेचून काढा, अशी मागणी साऱ्या देशवासियांकडून केली जात आहे. पहलगाम घटनेनंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध असलेल्या रोषात आणखी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने या घटनेनंतर पाकिस्तानची कोंडी करणारे बरेच निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता खेळासंदर्भात एक मोठा निर्णय घेत पाकिस्तानला दणका दिला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र पहलगाम घटनेनंतर भारतात पीएसएलचे सामने न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात पीएसएलचं प्रसारण करणाऱ्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणि पीएसलला मोठा झटका लागला आहे.

प्रसारणावर बंदी घातल्याने काय होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएसएल स्पर्धतील सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातल्याने भारतात हे सामने पाहता येणार नाही. त्यामुळे पीएसएल पाहणाऱ्यांच्या संख्येत आपोआप घट होईल, ज्याचा थेट फटका बसेल. तसेच या निर्णयामुळे आर्थिक कोंडी होण्यास मदत होईल. पीएसएलच्या प्रसारणावर बंदीमुळे पाकिस्तान क्रिकेटसाठी हा मोठा झटका आहे.

PSL 2025 बाबत थोडक्यात

दरम्यान पीएसएल 2025 स्पर्धेत एकूण 6 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस आहे. या स्पर्धेत लाहोर कलंदर्स, इस्लामाबाद युनायटेड, क्वेटा ग्लेडीएटर्स, पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान्स आणि कराची किंग्स असे 6 संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. या स्पर्धेला 11 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. तर 18 मे ला विजेता निश्चित होणार आहे. या दरम्यान या 6 संघांमध्ये 34 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र भारतात आता या स्पर्धेच्या प्रसारणावर बंदी घातल्याने पाकिस्तान क्रिकेटची चांगलीच आर्थिक कोंडी होणार, हे मात्र निश्चित झालं आहे.

पीएसलवर भारतात बंदी

क्रिकेटपटूंकडूनही घटनेचं निषेध

दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. आयपीएल 2025 मध्ये खेळत असलेल्या अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त करत या दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच मृतांना श्रद्धांजलीही वाहिली. बुधवारी 23 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच हा सामना अगदी साधेपणाने खेळवण्यात आला.