
भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम लावला आहे. अचानकपणे त्याने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. आयपीएल स्पर्धा खेळण्यास तसा काही आर अश्विनला अडसर नव्हता. पण मागच्या पर्वात त्याची कामगिरी काही खास राहिली नव्हती. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने 9 सामन्यात फक्त 7 विकेट घेतल्या होत्या. तसेच फलंदाजीतही काही खास करू शकला नाही. पण एका स्पर्धेच्या कामगिरीवर आर अश्विनचं मूल्यमापन करणं कठीण आहे. यावरून क्रीडाप्रेमींची चर्चा सुरु झाली आहे. असं असताना आर अश्विनने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. अचानक निवृत्ती घेण्याचं कारण त्याने स्पष्ट केलं आहे. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर याबाबत खुलसा केला आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचं खरं कारण काय ते क्रीडाप्रेमींना कळलं आहे.
आर अश्विन निवृत्ती घेण्यापूर्वी वेगळ्या चर्चांचा फड रंगला होता. तेव्हा आर अश्विनने फ्रेंचायझीकडे रिलीज करण्याची मागणी केल्याची चर्चा होती. तसेच पुढच्या पर्वात वेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसू शकतो. पण आर अश्विन त्या आधीच निवृत्ती जाहीर केली. आर अश्विनने सांगितलं की, आता तीन महिने चालणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही. माझं शरीर आता मला तशी साथ देत नाही. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्ण फिट असणं गरजेचं आहे. मी आता तितकी मेहनत करू शकणार नाही.
आर अश्विनने पुढे सांगितलं की, तीन महिन्यांची आयपीएल स्पर्धा माझ्या दृष्टीने खूप जास्त आहे. थकवणारी आहे. हेच एक कारण आहे की मी महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला पाहून आश्चर्यचकीत होतो. आता आर अश्विनने भविष्याच्या दृष्टीने आपले पत्तेही ओपन केले आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यास उपलब्ध असेल असं सांगितलं. त्यामुळे आर अश्विन भविष्यात द हंड्रेड लीग आणि दक्षिण अफ्रिकन लीग स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. तसे त्याने संकेत देखील दिले आहेत. आर अश्विनने सांगितलं की, एका लीगसाठी नोंदणी केली आहे. विदेशात होणाऱ्या टी20 स्पर्धेत खेळण्यास तयार आहे.