
मुंबई : रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबई आणि तामिळनाडू आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल तामिळनाडूच्या बाजूने लागला. कर्णधार रविश्रीवासन साई किशोर याने क्षणाचाही विचार न करता फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय अंगलट आल्याचं दिसून आलं. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर साई सुदर्शनच्या रुपाने पहिला धक्का बसला. शार्दुल ठाकुरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर झटप विकेट्सची मालिका सुरु झाली. नारायण जगदीशन याला मोहित अवस्थीने 4 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर तुषार देशपांडेने आपल्या भेदक गोलंदाजीने कोणाला डोकं वर काढू दिलं नाही. प्रदोष रंजन पॉल, रविश्रीवासन साई किशोर आणि बाबा इंद्रजीथ यांना झटपट बाद केलं. तामिळनाडूची स्थिती नाजूक असताना मधल्या फळीच्या विजय शंकर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरला. सहाव्या गड्यासाठी 48 धावांची भागीदारी केली. विजय शंकर 44 धावा करून बाद होताच पुन्हा एकदा विकेट्सची घसरण सुरु झाली.
एम मोहम्मद 17 धावां करून तंबूत परतला. एस अजिथ रामही काही खास करू शकला नाही. 15 धावांवर असातना तनुश कोटियन त्याला तंबूचा रस्ता दाखवला. संदीप वॉरियर आला तसा तंबूत गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. एकीकडे झटपट विकेट पडत असताना वॉशिंग्टन सुंदरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी तोही बाद झाला. त्याने वैयक्तिक 43 धावा केल्या संघाचा डावा 146 धावांवर आटोपला.
तामिळनाडूने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईची स्थिती डळमळीत झाली. पृथ्वी शॉला या सामन्यातही सूर गवसला नाही. अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर भुपेन ललवानी 15 धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशीर खान नाबाद 24 आणि मोहित अवस्थी नाबाद 1 धावेवर खेळत आहे. तर संघाचा 2 बाद 45 धावा झाल्या. अजूनही तामिळनाडूकडे 101 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईचे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र तो कशी कामगिरी याकडे लक्ष लागून आहे. कारण नुकतंच त्याला सेंट्रल काँट्रॅक्टमधून दूर केलं असून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता श्रेयस अय्यर रणजी खेळत आहे.
तामिळनाडू : साई सुदर्शन, नारायण जगदीसन (विकेटकीपर), प्रदोष पॉल, रविश्रीनावसन साई किशोर (कर्णधार), बाबा इंद्रजीत, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजिथ राम, संदीप वॉरियर, कुलदीप सेन
मुंबई : पृथ्वी शॉ, भुपेन ललवानी, मुशीर खान, मुशीर खान, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकुर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शम्स मुलानी, हार्दिक ठोमरे, तनुश कोटियन, तुषार देशपांडे.