रविंद्र जडेजाने फक्त 73 सेकंदातच केला खेळ खल्लास, अनिल कुंबळेचा रेकॉर्डही केला नावावर

इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली. या मालिकेत काही खेळाडूंना सूर गवसला, तर काही खेळाडू अजूनही प्रतिक्षेत आहेत. पण सर रविंद्र जडेजा याने या वनडे मालिकेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फक्त 73 सेकंदात त्याने विक्रम नोंदवला आहे.

रविंद्र जडेजाने फक्त 73 सेकंदातच केला खेळ खल्लास, अनिल कुंबळेचा रेकॉर्डही केला नावावर
Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 10, 2025 | 3:00 PM

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून पूर्ण केलं. सलग दुसरा सामना जिंकून भारताने ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. असं असताना इंग्लंड संघाला एक प्रकारे ग्रहण लागल्याचं दिसत आहे. दुसऱ्या सामन्यातही ऑल आऊट झाली. या सामन्यात रविंद्र जडेजाच्या फिरकीपुढे इंग्लंडचा रंग फिका पडला. दुसऱ्या सामन्यात रविंद्र जडेजाने तीन विकेट घेत काही विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविंद्र जडेजाने 73 सेकंदात ओव्हर संपवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्णधार रोहित शर्मा याने संघाचं 24वं षटक रविंद्र जडेजाकडे सोपवलं. हॅरी ब्रूक समोर फलंदाजी करत होता. रविंद्र जडेजाने या आधीच 4 षटकात 15 धावा देत एक गडी बाद केला होता. त्यामुळे रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीचा अंदाज असल्याने हॅरी ब्रूकने सावध पवित्रा घेतला. रविंद्र जडेजाने या षटकातील पहिले दोन चेंडू फुलिश डिलिव्हरी टाकले. त्यानंतर तिसरा चेंडू जोरात लेग स्टंपवर टाकला. चौथा चेंडू फुल लेंथ टाकत स्टंपमध्ये टाकला. त्यानंतर पाचवा आणि सहावा चेंडू खेळताना हॅरी ब्रूक चाचपडला. त्यामुळे या सामन्यातील पहिलं निर्धाव टाकण्यात रविंद्र जडेजाला यश आलं. रविंद्र जडेना लाईव्ह स्ट्रीमिंगनुसार फक्त 72 सेकंदात षटक संपल्याचं दिसलं. समालोचकांनी या गोष्टीचं लाईव्ह सुरु असताना कौतुक केलं.

जडेजाने या सामन्यात तीन विकेट घेतल्या. बेन डकेटला 65 धावांवर, जो रूटला 69 धावांवर, तर 6 धावांवर असलेल्या जॅमी ओवर्टनलाही तंबूचा रस्ता दाखवला. यासह रविंद्र जडेजा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्ध जडेजाने 119 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी अनिल कुंबळेने इंग्लंडविरुद्ध 117 विकेट घेतल्या आहेत. या यादीत आर अश्विन आघाडीवर आहे. आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध 150 विकेट घेतल्या आहेत. तर जो रूटला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 13 वेळा बाद करणारा खेळाडू ठरला आहे.

दुसरीकडे, 300 धावा करूनही इंग्लंडची हरण्याची ही 28 वी वेळ आहे. 99 सामन्यात इंग्लंडने 300 हून अधिक धावांचं टार्गेट दिलं होतं. त्यात 28 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दरम्यान, भारताने 300 धावा करून 136 पैकी 27 सामने गमावले आहेत. तर वेस्ट इंडिजने 62 पैकी 23 सामने गमावले आहेत. श्रीलंका या यादीत चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने 87 सामन्यात 300 हून अधिक धावा केल्या आणि 19 सामने गमावले.