
आयपीएल 2026 स्पर्धेआधी संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही फ्रेंचायझी या करारासाठी अनुकूल असल्याचं माहिती आहे. मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंची अदलाबदल होणार आहे, अशी माहिती आहे. 15 नोव्हेंबर रिटेन्शन यादी देण्याची शेवटची तारीख आहे. तत्पूर्वी या ट्रेडची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण ही ट्रेड पूर्ण होण्यापूर्वीच आतल्या गोष्टी बाहेर येत आहेत. एका रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजाने ट्रेडला होकार देण्यापूर्वीच एक अट ठेवली आहे. राजस्थान रॉयल्ससमोर कर्णधारपदाचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव राजस्थान रॉयल्सला मान्य असल्याचं दिसत आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स रवींद्र जडेजासारख्या अनुभवी खेळाडूसाठी संघात नेतृत्व बदल करण्यासही तयार आहेत.
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या तयारीत असल्याने फ्रेंचायझीला एका नेतृत्वाची आवश्यकता होतीच. संजू सॅमसन मागच्या चार वर्षांपासून राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत आहे. पण मागच्या पर्वात दुखापतीमुळे पूर्ण सिझन खेळू शकला नव्हता. काही सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरला आणि संघाची धुरा युवा रियान परागच्या खांद्यावर दिली गेली. जडेजाला संघात घेण्याची तयारी झाल्याने फ्रेंचायझीने तरुण चेहऱ्याऐवजी अनुभवाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तसं झालं तर रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा कर्णधारपद भूषवेल. रवींद्र जडेजाचं आयपीएल करिअर राजस्थान रॉयल्सपासूनच सुरु झालं होतं.
दरम्यान, रवींद्र जडेजाचा कर्णधारपदाचा अनुभव फार काही चांगला नाही. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद दिलं होतं. मात्र त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे फक्त 8 सामन्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं होतं. आता रवींद्र जडेजा पुन्हा एकदा कर्णधारपदाच्या भूमिकेसाठी तयार झाला आहे. त्यामुळे कर्णधारपदाच्या शर्यतीत असलेल्या रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल या युवा चेहऱ्यांना धक्का बसणार आहे. पण जडेजाला कर्णधारपद दिलं नाही तर मात्र या दोघांपैकी एकाची नियुक्ती कर्णधारपदी होऊ शकते.