
Team India : भारतीय टीम एशिया कपमध्ये (Asia Cup 2025) दमदार कामगिरी बजावत आहेत. पाकिस्तानला टीम इंडियासमोर दोनदा गुडघे टेकावे लागले आहे. पण या दोन्ही सामन्यात भारताचा ऑलराऊंडर ऋषभ पंतची कमी सर्वांनाच जाणवली. आता त्याच्या चाहत्यांसाठी अजून एक धक्का बसला आहे. ऋषभ पंत हा इंग्लंड दौऱ्यात जायबंदी झाला. त्याच्या पायाला इजा झाली होती. आशिया कपमध्ये सुद्धा त्याला सहभागी होता आले नाही. आता अजून एका दौऱ्यातून तो बाद झाला आहे. कारण तरी काय? ताज्या माहितीनुसार, तो वेस्टइंडीजविरोधातील कसोटी मालिकेतही सहभागी नसेल.
का बाहेर झाला पंत?
समोर आलेल्या माहितीनुसार, पंत अजूनही जायबंदीच आहे. त्याच्या पायाला जबर दुखापत आहे. त्यातून तो सावरलेला नाही. इंग्लंड दौऱ्याच्या चौथ्या कसोटीत क्रिस वोक्स याचा चेंडू टोलवताना त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तो आशिया कपमध्ये सहभागी होऊ शकला नाही. आता ESPN-Crickinfo च्या वृत्तानुसार, 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्टइंडीज कसोटी सामन्यातही तो खेळणार नाही. तो या सीरीजमधून बाद झाला आहे.
अजित अगरकर यांच्या निवड समिती 24 सप्टेंबर रोजी, उद्या वेस्टइंडीज सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा करतील. पण त्यापूर्वीच ऋषभ पंत हा भारतीय संघात सहभागी नसेल असे संकेत मिळत आहेत. BCCI च्या वैद्यकीय पथकाने अद्याप ऋषभच्या तंदुरुस्तीविषयी हिरवा झेंडा दिला नाही. त्यामुळे पंतला हा कसोटी सामना सुद्धा खेळता येणार नसल्याचे समोर येत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तरी दिसणार का?
ऋषभ पंत टीम इंडियात कधी पुनरागमन करणार हा मोठा सवाल आहे. वेस्टइंडीज सीरीजनंतर भारतीय संघ हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असेल. येथे वनडे आणि टी 20 सामने खेळण्यात येतील. पंत हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण करेल अशी आशा आहे. तो चाचणीत उत्तीर्ण झाला तरच टीम इंडियात तो दाखल होऊ शकतो.
27 वर्षांचा ऋषभ पंत हा भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार आहे. तो फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो आता वेस्टइंडीज दौऱ्यासाठी नसल्याने केएल राहुल आणि संजू सॅमसन या दोन खेळाडूंचा पर्यायांचा विचार टीम इंडियाला करावा लागेल.