
भारतीय संघ आशिया कप स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. असं असताना दुसरीकडे बीसीसीआयच्या गोटात घडामोडी वेगाने घडत आहेत. कारण बीसीसीआयने रोहित शर्माला बोलावणं धाडलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट मैदानापासून दूर आहे. टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या रोहित शर्मा आराम करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अद्याप एकही वनडे सामना झालेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका खेळेल, अशी चर्चा आहे. तसेच संघाचं नेतृत्वही त्याच्याकडेच असण्याची शक्यता आहे. असं असताना रोहित शर्मा बीसीसीआयच्या सेंट्रल ऑफ एक्सलन्सला रिपोर्ट करणार आहे.
भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा 13 सप्टेंबरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे फिटनेस टेस्टसाठी हजर राहणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका सूत्राने सांगितलं की, सीओई 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान मुख्य मैदान (ए) वर दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीचं आयोजन करणार आहे. यासाठी रोहित शर्माची फिटनेस टेस्ट त्याच सुविधा असलेल्या वेगळ्या मैदानावर होईल. रोहित 13 सप्टेंबरपासून बीसीसीआय सीओई येथे फिटनेस टेस्टसाठी उपलब्ध असेल. येथे दोन ते तीन दिवस राहील. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी त्याची तयारी सुधारण्यासाठी सराव करेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. यातील पहिला सामना 30 सप्टेंबरला होणार आहे. दुसरा सामना 3 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीची तयारी असणार आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. अशा स्थितीत दोन्ही दिग्गज खेळाडूंना आपली तयारी करण्याची संधी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध मिळेल.