
टीम इंडियाचा आज 11 वर्षापासूनचा ICC ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न असेल. T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत जबरदस्त प्रदर्शन केलय. सेमीफायनलमध्ये इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही टीम्स एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. दोन्ही टीम्सच्या वर्ल्ड कपमधील प्रदर्शनावर नजर टाकली, तर दक्षिण आफ्रिकेने काही सामन्यात निसटत्या फरकाने विजय मिळवलाय. तेच टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा अपवाद वगळता सर्व सामने आरामात जिंकले आहेत. पाकिस्तान विरुद्ध मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत अक्षरक्ष: विजय खेचून आणला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीनवेळा आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. वनडे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही ठिकाणी ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. आता बारबाडोसमध्ये रोहित शर्माकडे कदाचित आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची शेवटची संधी असेल. रोहित आयसीसी ट्रॉफी विजयाची प्रतिक्षा संपवायला आतुर असेल असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलय.
‘नशिबाची साथ सुद्धा गरजेची’
“सहा-सात महिन्यात रोहित दोन वर्ल्ड कपच्या फायनल गमावेल असं वाटत नाही. सात महिन्यात त्याच्या नेतृत्वाखाली दोन फायनल गमावल्या, तर रोहित बारबाडोसच्या समुद्रात उडी मारेल” असं सौरव गांगुलीने म्हटलय. “त्याने आघाडीवर राहून नेतृत्व केलय. उत्तम फलंदाजी केलीय. उद्या सुद्धा हे कायम राहील अशी अपेक्षा आहे. मोकळेपणाने खेळताना भारत योग्य पद्धतीने समापन करेल अशी अपेक्षा आहे. टुर्नामेंटमधील ही एक उत्तम टीम आहे. माझ्याकडून त्यांना विजयासाठी शुभेच्छा. नशिबाची साथही त्यांना असेल अशी अपेक्षा. मोठ्या टुर्नामेंट जिंकण्यासाठी नशिबाची साथ सुद्धा गरजेची असते” असं सौरव गांगुली म्हणाला.