RR vs CSK : 6,6,6,6,6,4,4,4,4, वैभव सूर्यवंशीची फायर खेळी, 15 चेंडूत अर्धशतकी झंझावात
Vaibhav Sooryavanshi Fifty CSK vs RR : वैभव सूर्यवंशी याने 19 व्या हंगामात तडाखेदार सुरुवात करत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झंझावाती आणि वादळी अर्धशतक ठोकलं आहे. वैभवच्या आयपीएल कारकीर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं.

राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात अप्रतिम सुरुवात केली आहे. वैभवने चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना खणखणीत अर्धशतक ठोकत राजस्थानला अप्रतिम सुरुवात करुन दिलीय. चेन्नई सुपर किंग्सने जेमी ओव्हरटन याच्या झुंजार खेळीच्या जोरावर गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलंय. सलामीला आलेल्या वैभवने या विजयी धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. वैभवने यशस्वी जैस्वाल याच्यासह चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वैभवने यासह अर्धशतक पूर्ण केलं.
वैभवचं सिक्ससह अर्धशतक
नूर अहमद याने टाकलेल्या सहाव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स ठोकून वैभवने अर्धशतक ठोकलं. वैभवने अवघ्या 15 बॉलमध्ये 333.33 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने या खेळीतील 50 पैकी 46 धावा या 9 चेंडूत केल्या. वैभवने या अर्धशतकी खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. वैभवच्या आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं तर 19 व्या हंगामातील पहिलं अर्धशतक ठरलं. वैभवने यासह विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारखा कारनामा केला. विराट आणि रोहित या दोघांनीही 19 व्या हंगामात आपल्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. विराटने सनरायजर्स हैदराबाद तर रोहितने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अर्धशतक पूर्ण केलं.
वैभव सूर्यवंशीचं चाबूक अर्धशतक
वैभव यासह राजस्थानसाठी वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. तसेच वैभवचं हे आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं. वैभवने याआधी गेल्या वर्षी गुजरात टायटन्स विरुद्ध जयपूरमध्ये अर्धशतकापर्यंत पोहचण्यासाठी 17 चेंडूंचा सामना केला होता. तसेच राजस्थानसाठी सर्वात वेगवान 13 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम हा यशस्वी जैस्वाल याच्या नावावर आहे. यशस्वीने 2023 साली केकेआर विरुद्ध ही कामगिरी केली होती.
वैभवला ही खेळी आणखी मोठी करण्याची संधी होती. मात्र वैभव अर्धशतकानंतर काही चेंडू खेळून आऊट झाला. वैभवने 17 बॉलमध्ये एकूण 52 रन्स केल्या. अंशुल कंबोज याने वैभवच्या खेळीला ब्रेक लगावला. अंशुलने वैभवला सर्फराज खान याच्या हाती कॅच आऊट केलं.
पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी
दरम्यान वैभवने राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल याच्यासह पहिल्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. दोघांनी 38 बॉलमध्ये या 75 धावा जोडल्या. आता राजस्थान उर्वरित धावा किती चेंडूत पूर्ण करते हे निकालानंतरच स्पष्ट होईल.