
आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आफ्रिका रिजनमधून तिकीट मिळवणाऱ्या नामिबियाने इतिहास रचत क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने गतउपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला एकमेव टी 20i सामन्यात पराभूत करत कारनामा केला आहे. दक्षिण आफ्रिकेने नामिबियासमोर 135 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नामिबियाला या धावांचा पाठलाग करताना विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 11 तर तर शेवटच्या बॉलवर 1 धावेची गरज होती. तेव्हा नामिबियाच्या फलंदाजाने चौकार ठोकत संघाला ऐतिहासिक आणि 4 विकेट्सने अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेला नवख्या नामिबियासमोर 150 धावांचा टप्पाही गाठत आला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी जे स्मिथ याने सर्वाधिक 31 धावा केल्या. रुबीन हर्मनने 23 धावा जोडल्या. ओपनर लुहान डी प्रिटोरियसने 22 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी गेराल्ड कोएत्झी (12) आणि ब्योर्न फोर्च्युन (19) या जोडीने निर्णायक खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 100 पार मजल मारता आली. नामिबियाने दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 झटके देत 134 रन्सवर रोखलं. नामिबियासाठी रुबेन ट्रंपलमान याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. रुबेनने 4 ओव्हरमध्ये 7 च्या इकॉनॉमी रेटने 28 धावा देत दक्षिण आफ्रिकेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्त दाखवला.
दक्षिण आफ्रिकेसमोर नामिबिया 135 धावा काय करणार? असं वाटत होतं. मात्र नामिबियाने करुन दाखवलं. नामिबियाची विजयी धावांचा पाठलाग करताना 13 ओव्हरनंतर 5 आऊट 84 अशी स्थिती झाली होती. मात्र जेन ग्रीन याने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. ग्रीनने 23 बॉलमध्ये नॉट आऊट 30 रन्स केल्या. तर रुबेल ट्रंपलमान याने नाबाद 11 धावा केल्या. यासह या दोघांनी अखेरच्या क्षणी नामिबियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये 11 रन्सची गरज होती. ग्रीनने पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स खेचला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला. त्यानंतर ग्रीनने दुसऱ्या बॉलवर 1 रन घेतली. नामिबियाने तिसऱ्या बॉलवर 2 रन्स केल्या. चौथ्या बॉलवर नामिबियाने 1 धाव घेतली. अशाप्रकारे नामिबियाने बरोबरी केली. त्यामुळे हा सामना नामिबिया गमावणार नाही, हे निश्चित झालं.
नामिबियाचा थरारक विजय
THE HISTORIC MOMENT…!!! 😍
– Namibia Defeated South Africa in the T20I, Winning celebration was emotional. pic.twitter.com/uboCiwnOdE
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2025
शेवटच्या ओव्हरमधील पाचवा बॉल डॉट राहिला. त्यामुळे आता नामिबियाला शेवटच्या बॉलवर 1 रनची गरज होती. ग्रीनने शेवटच्या बॉलवर फोर ठोकला आणि नामिबियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.