
न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. न्यूझीलंडने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी मात केली आहे. न्यूझीलंडने केन विलियमसन आणि रचीन रवींद्र या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 363 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलर याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 312 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडची ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची एकूण तिसरी तर 2009 नंतरची पहिली वेळ ठरली. तर आता 9 मार्चला टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स होण्यासाठी महामुकाबला होणार आहे.
न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने 108 आणि केन विलियसमन याने 102 धावांची खेळी केली. तसेच डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी प्रत्येकी 49-49 धावांचं योगदान दिलं. या चौघांनी प्रमुख खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. किवींनी 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 362 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.कगिसो रबाडा याने दोघांना माघारी पाठवलं. तर वियान मुल्डर याने 1 विकेट घेतली.
त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट लवकर गमावली. रायन रिकेल्टन 17 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा रासी वन डेर डुसेन या दोघांना चांगली सुरुवात मिळाली. दोघांनी शतकी भागीदारी करत वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दोघांना वेळीच रोखलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रासी वन डेर डुसेन याने 69 तर टेम्बा बावुमा याने 56 धावा केल्या.
त्यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाची फक्त औपचारिकताच राहिली. मात्र डेव्हिड मिलर याने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला. मिलरने सामन्यातील शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत शतक पूर्ण केलं. मात्र मिलरची शतकी खेळी दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यासाठी पुरेशी ठरली नाही. अशाप्रकारे न्यूझीलंडने विजय मिळवला. न्यूझीलंडसाठी कॅप्टन मिचेल सँटनर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मॅट हॅन्नी आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मायकल ब्रेसवेल आणि रचीन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दक्षिण अफ्रिका प्लेइंग इलेव्हन: टेम्बा बावुमा (कर्णधार), रयान रिकेलटन, रासी वन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एडन मार्करम, वियान मुल्डर, मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.