SA vs PAK, 2nd Test : पाकिस्तानची पहिल्याच दिवशी 5 बाद 259 अशी स्थिती, दक्षिण अफ्रिकेपुढे मोठा पेच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहे. दुसरा कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवसावर पाकिस्तानने पकड मिळवली आहे. काय आहे एकंदरीत स्थिती ते जाणून घेऊयात.

SA vs PAK, 2nd Test : पाकिस्तानची पहिल्याच दिवशी 5 बाद 259 अशी स्थिती, दक्षिण अफ्रिकेपुढे मोठा पेच
SA vs PAK, 2nd Test : पाकिस्तानची पहिल्याच दिवशी अशी स्थिती, दक्षिण अफ्रिकेपुढे मोठा पेच
Image Credit source: South Africa Cricket Twitter
| Updated on: Oct 20, 2025 | 8:18 PM

दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाकिस्तानने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीच कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी 91 षटकांचा खेळ झाला. पाकिस्तानने 5 गडी गमवून 259 धावा केल्या आहेत. तर सऊद शकील नाबाद 42 आणि सलमान आघा नाबाद 10 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीकने 57, इमाम उल हकने 17, कर्णधार शान मसूदने 87, बाबर आझमने 16 आणि मोहम्मद रिझवानने 19 धावांची खेळी केली. शफीकने शान मसूदसोबत दुसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. दक्षिण अफ्रिकेकडून केशव महाराज आणि सिमोन हारमर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली. आता दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांना झटपट बाद करण्याचं आव्हान असणार आहे.

मैदान फिरकीला फार काही मदत करणारं नाही. त्यामुळे चेंडू वळत नसल्याचं पहिल्या दिवशी दिसून आलं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी चेंडूला वळण मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान दुसरा नवीन चेंडू हा फक्त सात षटकं जुना आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. मार्को यानसेन आणि कागिसो रबाडा पहिल्या सत्रात झटपट विकेट काढू शकतात. तर पाकिस्तान पहिल्या डावात किमान 350 धावांचं लक्ष्य ठेवण्याच्या प्रयत्ना असेल. आता दुसऱ्या दिवशी काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थिती

पाकिस्तानने एका सामन्यातील विजयामुळे विजयी टक्केवारी 100 टक्के झाली आहे. यासह ऑस्ट्रेलियासह संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे. आता दुसरा कसोटी सामना पाकिस्तानने जिंकला तर विजयी टक्केवारी 100 असणार आहे. त्याचा पाकिस्तानला फायदा होईल. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेने हा सामना जिंकला तर पाकिस्तानची घसरण थेट चौथ्या स्थानावर होणार आहे. कारण विजयी टक्केवारी 50 वर येईल. त्याचा थेट फायदा भारताला होईल. पण हा सामना ड्रॉ झाला तर पाकिस्तानचे 66.67 विजयी टक्केवारी होईल. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर असतील. सध्या भारताची विजयी टक्केवारी 61.90 असून सध्या चौथ्या स्थानावर आहे.