
आशिया कप 2025 स्पर्धेतून पाकिस्तान संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घालवलेली पत पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करेल. कारण मागच्या काही वर्षात पाकिस्तानची गिनती सुमार संघात केली जात आहे. दुबळ्या संघांनी पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. आता ट्रायसिरिज विजयानंतर पाकिस्तानी संघाने पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतण्याच मानस केला आहे. पाकिस्तानचा आशिया कप 2025 स्पर्धेतील पहिला सामना ओमानविरुद्ध होणार आहे. 12 सप्टेंबरला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे. असं असताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे त्याच्या रडारवर अप्रत्यक्षपणे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान आले आहेत. त्याने स्पष्ट केलं की, हा पाकिस्तानी संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे.
सलमान आघाने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘लोकांनी क्रिकेटकडे पाठ का फिरवली हे विचार करण्याची वेळ आहे. कारण 2023 आणि 2025 या कालावधीत आण्ही त्या प्रकारचं क्रिकेट खेळलो नाहीत. त्यामुळे लोकांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. आमच्या तशा खेळण्यामुळे वारसा खराब झाला. जर चाहते रागवले असतील तर त्यांच्याकडे योग्य कारण आहे.’ सलमान आघाच्या या वक्तव्याचा थेट बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानकडे रोख असल्याचं बोललं जात आहे. कारण या कालावधीत या दोघांकडेच धुरा होती. टी20 फॉर्मेटमध्ये तर संघाची पार वाट लागली. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता.
सलमान आघाने पुढे सांगितलं की, ‘मला इतके ट्रोल केले गेले आहे की आता कोणी माझ्याबद्दल काही चांगले बोलले तरी मला काही फरक पडत नाही.’ दुसरीकडे, सलमान आघाच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्व गुणांचं माजी क्रिकेटपटून वसीम अक्रमनेही कौतुक केलं आहे. आता भारत विरूद्धच्या सामन्यात सलमान आघाच्या नेतृत्वाखालील संघ कशी कामगिरी करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.