
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींची मोर्चेबांधणी सुरु आहे. मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण झाली. त्यानंतर रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. आता आयपीएल 2026 मिनी लिलावाची तयारी सुरु आहे. मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. असं असताना ट्रेड विंडोत सर्वात मोठी डील पार पडली ती म्हणजे संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांची… दोघेही दिग्गज खेळाडू पण फ्रेंचायझींना आवश्यकतेनुसार या खेळाडूंची गरज भासली. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून खेळाडूंसाठी बोलणी सुरु होती. अखेर दोन्ही फ्रेंचायझी आणि खेळाडूंची मान्यता मिळालानंतर ही ट्रेड यशस्वी झाली. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात गेल्यानंतर फ्रेंचायझीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसत आहे. यासह एक पोस्ट केली आहे. यात संजू सॅमसन संघाबाबत आपल्या भावना व्यक्त करत आहे.
विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन सीएसके संघात रूजू होताच त्याने सांगितलं की, ‘मी या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होतो. मी खूप नशिबवान आहे की मी पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. मी कायम डार्क रंगात दिसत असतो. जसं की काळा, निळा, ब्राउन.. पण आतापर्यंत पिवळी जर्सी परिधान केली नव्हती. ही जर्सी परिधान करण्याच्या वेगळ्याच भावना आहेत. मी कधीच याचा विचार केला नव्हता की सीएसकेची जर्सी परिधान केल्यानंतर काय फील करेन. खूप सकारात्मक वाटत आहे आणि खूप खूश आहे. ही जर्सी परिधान केल्यानंतर एक वेगळंच फिलिंग येत आहे. मी चॅम्पियन्ससारखं फील करत आहे.’
चेन्नई सुपर किंग्सने एकूण 9 खेळाडूंना मिनी लिलावापूर्वी रिलीज केलं आहे. त्यामुळे पर्समध्ये 43.3 कोटी शिल्लक आहेत. आता मिनी लिलावात हीच रक्कम घेऊन चेन्नई सुपर किंग्सचा संघ बोली लावणार आहे. आता मिनी लिलावात कोणता खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स : एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओवर्टन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल. (संजू सॅमसन (ट्रे़ड))