अंतिम फेरीत अभिषेक ऐवजी संजू सॅमसन उतरणार ओपनिंगला? नेमकं काय घडलं जाणून घ्या

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यातील पराभव म्हणजे आयुष्यभराचं डोक्यावरचं ओझं असणार आहे. त्यामुळे खेळाडू तयारीत आहे. असं असताना सोशल मीडियावर भलतंच सुरु झालं आहे.

अंतिम फेरीत अभिषेक ऐवजी संजू सॅमसन उतरणार ओपनिंगला? नेमकं काय घडलं जाणून घ्या
अंतिम फेरीत अभिषेक ऐवजी संजू सॅमसन उतरणार ओपनिंगला? नेमकं काय घडलं जाणून घ्या
| Updated on: Sep 28, 2025 | 7:30 PM

आशिया कप स्पर्धेपूर्वी शुबमन गिलची संघात एन्ट्री झाली आणि ओपनिंगची जोडी बदलली. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलने या स्पर्धेत ओपनिंग करत आहेत. अभिषेक शर्माच्या आक्रमक खेळीमुळे भारताला चांगली सुरुवात मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंतिम फेरीत अभिषेक शर्माकडे लागून आहेत. त्याने या स्पर्धेत स्फोटक खेळी केली आहे. तसेच आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला अभिषेक शर्माची धास्ती लागून आहे. पण अंतिम फेरीत अभिषेक शर्माची जागी संजू सॅमसन ओपनिंगला येईल? अशी चर्चा रंगली आहे. सामन्याच्या काही तासाआधी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये असंच चित्र दिसलं.त्यामुळे मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यापूर्वी स्टेडियमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोत शुबमन गिलसोबत सलमीला संजू सॅमसनचं नाव दाखवलं गेलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण अभिषेक शर्माला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याची चर्चा होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींना शंका वाटू लागली आहे. त्यात पाकिस्तानी दुबई स्टेडियमच्या प्रेस बॉक्समधील टीव्हीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने संशय वाढला आहे. यात भारत पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. तसेच संजू सॅमसन आणि शुबमन गिल फलंदाजीला येत आहेत. तर शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. म्हणजेच पाकिस्तानने नाणेफेक जिंकला असा अर्थ निघत आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका. कारण त्या फोटोत काही तथ्य नाही.

सामना सुरू होण्यापूर्वी मिडिया आणि ब्रॉडकास्टिंग टीम विविध चाचण्या देखील घेत असतात. काही चुका होऊ नये यासाठी ग्राफिक्स फायर करून तपासलं जातं. यात स्कोअरकार्डपासून ग्राफिक्स आणि खेळाडूंची नावं तपासली जातात. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा त्या चाचणीचा एक भाग आहे. त्यामुळे संजू सॅमसन आणि शुबमन गिल ओपनिंग करणार यात काही तथ्य नाही. शुबमन गिलसोबत अभिषेक शर्मा मैदानात उतरणार हे निश्चित आहे.