
Saurav Ganguly Experience Ghost: इंग्लंडमधील काऊंटी डरहम येथील लुमली कॅसल एक राजमहल आहे. तो आता एका आलिशान हॉटेलमध्ये रुपांतरी करण्यात आला आहे. हा राजमहल 1389 मध्ये बांधण्यात आला. हा महल एक अद्भूत आणि भव्य कलाकृती आहे. तर या हॉटेलसंबंधी अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत. त्यात इथे पॅरानॉर्मल घटनांचा अनेकांना अनुभव आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचा अनुभव टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला सुद्धा आल्याचे म्हटले जाते. काय आहे त्यामागील सत्य?
काय आहे ती भूतकथा?
लिली ऑफ लुमली हिची भूत कथा अधिक प्रसिद्ध आहे. 14 व्या शतकात लिली नावाची महिला या राजमहलाची मालकीण होती. कॅथलिक चर्चच्या नियमांचे पालन न केल्याने तिला विहिरीत ढकलून देण्यात आले होते. तेव्हापासून तिचा आत्मा या महलात भटकतो असा दावा करण्यात येतो. ही मालकीण तेव्हापासून पर्यटकांना आणि पाहुण्यांना घाबरवते असे मानले जाते. 2002 मध्ये भारतीय संघ जेव्हाी इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. तेव्हा या झपाटलेली हॉटेल पुन्हा चर्चेत आली. कारण त्यावेळी सौरव गांगुली याला विचित्र अनुभव आला. त्याला भूत, हडळ दिसल्याचे मानले जाते.
गांगुली ती रात्र विसरुच शकत नाही
टीम इंडिया, चेस्टर ले-स्ट्रीट सामन्यासाठी लुमली कॅसल हॉटेलमध्ये थांबली होती. तेव्हा सौरव गांगुली हा कर्णधार होता. त्याला एक आलिशान सूट देण्यात आला होता. रात्रीच्या जेवणानंतर तो झोपायला गेला. दिवे बंद केल्यावर त्याला बाथरुममधील नळ सुरू केल्याचा आवाज आला. त्याने बाथरुममध्ये जाऊन पाहिले तर नळ बंद होता. त्याला नंतर झोप लागली. मध्यरात्री पुन्हा त्याला पाणी पडण्याचा आवाज ऐकू आला. अनेकदा असे झाल्यावर गांगुली घाबरला. तो लागलीच रॉबिन सिंह याच्या रुममध्ये गेला. तिथे तो फरशीवर झोपला. रॉबिन सिंह याने त्याला वर झोपण्यास सांगितले. पण गांगुलीने त्याला आलेला अनुभव सांगितला नाही आणि आपल्याला फरशीवर झोपायचे असल्याचे सांगितले.
पुढे त्याने रात्रीचा आलेला हा अनुभव ‘बीफीज़ क्रिकेट टेल्स’ या पुस्तकात शेअर केला. त्या रात्री फार विचित्र अनुभव आला. रात्री झोपच लागत नव्हती. या घटनेने जीव घाबरला आणि आपण रॉबिन सिंहच्या रुममध्ये जाऊन झोपलो. कारण दुसऱ्या दिवशी सामना होता आणि झोपणं गरजेचं होतं असे गांगुलीने सांगितले. पण सामना संपल्यानंतर गांगुलीने त्या हॉटेलमध्ये थांबण्यास व्यवस्थापनाला नकार कळवला.
या पॅरानॉर्मल घटनांचा अनुभव एकट्या सौरव गांगुलीलाच आला असे नाही तर 2004 मध्ये वेस्ट इंडिज संघ आणि 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना सुद्धा असाच अनुभव आला. शेन वॉटसन तर इतका घाबरला की त्याला ब्रेट लीच्या खोलीत झोपावे लागले. अनेकांनी लिलीचे भूत पाहिल्याचा दावा केला आहे. या गोऱ्या महिलेला आपण पाहिल्याचा अनेकांचा दावा आहे. ही हॉटेल त्यांच्या वेबसाईटवर हे अनुभव शेअर करते हे विशेष आहे.