T20 WC 2026 : बांगलादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाल्यास कोणत्या संघाला मिळणार जागा? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळण्यास बांगलादेशने नकार दिला आहे. त्यामुळे आयसीसीपुढे पेच निर्माण झाला आहे. एका महिन्यात सामन्याचं वेळापत्रक बदलणं वाटतं तितकं सोपं नाही.

T20 WC 2026 : बांगलादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाल्यास कोणत्या संघाला मिळणार जागा? जाणून घ्या
बांगलादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाल्यास कोणत्या संघाला मिळणार जागा? जाणून घ्या
Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Jan 08, 2026 | 5:42 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाले असून मैदानंही ठरली आहेत. पण या स्पर्धेपूर्वी एका वादाला फोडणी मिळाली आहे. कारण बांग्लादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळू इच्छित नाही. आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमानला काढून टाकल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांगलादेशने हाचा धागा पकडून भारतात खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी बांगलादेशने आयसीसीला ईमेलद्वारे कळवलं आहे. आता प्रश्न असा आहे की बांग्लादेशच्या विनंतीला आयसीसीने नकार दिला तर काय? बांगलादेशने भारतात खेळण्यास होकार दिला तर प्रश्नच नाही. पण बांगलादेशचा संघ भारतात आलाच नाही तर काय? बांगलादेशला टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून वगळण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मग या संघाची जागा कोण घेईल? कोणता पर्याय आयसीसीपुढे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.

बांगलादेशने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास नकार दिला तर…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 20 संघ ठरले आहेत. त्यापैकी एक संघ म्हणजे बांग्लादेश आहे. आता बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि श्रीलंकेत आयसीसीने नियोजन केलं नाही, तर बांगलादेशचा संघ स्पर्धेतून आऊट होईल. अशा स्थितीत 19 संघांसह खेळणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे बांगलादेशच्या जागी एका संघाची निवड करणं भाग आहे. अशा स्थितीत आयसीसी बांगलादेशच्या जागी एका पात्र संघाची निवड करू शकते. अलिकडच्या पात्रता फेरी, क्रमवारी आणि तयारीच्या आधारावर हा निर्णय घेतला जाईल.

बांगलादेशला वगळलं तर स्कॉटलँडला पर्यायी संघ म्हणून जागा मिळेल. कारण यापूर्वीच या संघाने आयसीसी स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. स्कॉटलँडने युरोपियन पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे बांगलादेशच्या जागेवर स्कॉटलँडचा दावा मजबूत आहे. 2009 टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून झिम्बाब्वेने नाव मागे घेतलं होतं. तेव्हा स्कॉटलँडला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जागा मिळाली होती.  बांगलादेशची जागा एकदा वर्ल्डकप स्पर्धेतून गेली तर ती मिळवणं भविष्यात कठीण होऊ शकतं. याची अनुभूती झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला मागच्या काही वर्षात आली आहे.