दुखापतग्रस्त खेळाडू नंबर 7! आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सात खेळाडू आऊट, जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघांचं टेन्शन वाढलं आहे. कारण आहे ते खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींचं.. त्यामुळे संघांचं समीकरण बिघडलं आहे. आतापर्यंत सात खेळाडू टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकले आहेत.

दुखापतग्रस्त खेळाडू नंबर 7! आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सात खेळाडू आऊट, जाणून घ्या
दुखापतग्रस्त खेळाडू नंबर 7! आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सात खेळाडू आऊट, जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 06, 2026 | 6:05 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला काही तासात सुरुवात होणार आहे. त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वर्षभर ज्या गोलंदाजावर मेहनत घेतली तोच स्पर्धेपूर्वी जखमी झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं गणित बिघडलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला दुखपात झाली असून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत एक दोन आठवड्यात बरी होणारी नाही. त्यामुळे त्याला स्पर्धेत खेळता येणार नाही. त्याच्या जागी संघात मोहम्मद सिराजला संधी दिली गेली आहे. आता प्लेइंग 11 चं गणित बसवताना कर्णधार सूर्यकुमार यादवची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे, हर्षित राणा या स्पर्धेपूर्वी दुखापतग्रस्त होणारा पहिला खेळाडू नाही. दुखापतीमुळे स्पर्धेला मुकलेला सातवा खेळाडू आहे. आतापर्यंत कोण कोण दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकलं ते जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू बाद

दुखापतीचा सर्वात मोठा फटका हा ऑस्ट्रेलियाला बसला आहे. कारण त्यांचे दोन स्टार गोलंदाज या स्पर्धेला मुकले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची दबाव रणनिती कमकुवत होताना दिसत आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून आऊट झाले आहे. पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे, तर जोश हेझलवूड हॅमस्ट्रिंग आणि एचिलीजच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकले नाहीत. त्यांना यातून सावरण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. पॅट कमिन्सची जागा बेन ड्वॉर्शियस आणि हेझलवूडची जागा शॉन एबट घेण्याची शक्यता आहे.

दक्षिण अफ्रिकेचं दुखणंही तसंच

दक्षिण अफ्रिकन संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. संघातील दोन खेळाडू स्पर्धेतून आऊट झाले आहेत. टोनी डे जोरजी राइट हॅमस्ट्रिंग मसल टियरमुळे स्पर्धेला मुकला आहे. अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. दुसरीकडे, डोनोवन फरेराही एसए20 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे.

न्यूझीलंडला धक्का, अफगाणिस्तानचं नुकसान

या स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड संघाचा स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. राइट आर्म वेगवान गोलंदाज एडम मिल्न दुखापतीमुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी काइल जेमिसनला संधी दिली गेली आहे. तर अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीमुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. या खेळाडूच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

Follow Us