सीसीटीव्ही पाहिला तेव्हा मनात..; ऋषभ पंतच्या अपघातावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया

डिसेंबर 2022 मध्ये क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्यावर आता अभिनेता शाहरुख खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

सीसीटीव्ही पाहिला तेव्हा मनात..; ऋषभ पंतच्या अपघातावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया
ऋषभ पंत, शाहरुख खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2024 | 12:45 PM

आयपीएलमधील आपल्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबराम ईडन गार्डन्स स्टेडियमवर पोहोचले होते. सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना होता. याआधी जेव्हा वैझागमध्ये याच दोन संघांमध्ये सामना झाला होता, तेव्हा शाहरुख खानने मैदानावर ऋषभ पंतची भेट घेतली होती. केकेआरच्या विजयानंतर शाहरुख ऋषभला भेटायला मैदानावर गेला होता. तेव्हा त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीची जाणीव ठेवून किंग खानने त्याला बसून राहायला सांगितलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता शाहरुखने पहिल्यांदाच ऋषभच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख ऋषभ पंतच्या अपघाताबद्दल व्यक्त झाला. तो म्हणाला, “ते अत्यंत भयंकर होतं. मी त्याच्या कारच्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज पाहिला होता. तो खूप भयानक होता. त्यावेळी त्या अपघातानंतर नेमकं काय झालं, हे आपल्याला माहित नव्हतं. अशा वेळी मनात असंख्य नकारात्मक विचार येतात. या वयातली मुलं म्हणजे माझ्या मुलासारखीच आहेत. माझ्या टीममध्येही अनेक तरुण खेळाडू आहेत. त्यामुळे त्याला दुखापत होऊ नये, हाच विचार माझ्या मनात होता.”

“एखाद्या खेळाडूला दुखापत झाली की ते दुप्पट नुकसान असतं. तुम्हा-आम्हाला कुठे लागलं तरी त्याचं एवढं काही वाटत नाही. ऋषभला मी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो. त्याचा गुडघा लवकर बरा होऊ दे. म्हणूनच मी त्याला म्हणत होतो की उठू नकोस, तुला वेदना होत असतील. जेव्हा मी त्याला मिठी मारली, तेव्हा हेच विचारलं की तू बरा आहेस का? कारण अपघातानंतर मी त्याला भेटलोच नव्हतो. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानावर पाहून मला खूप आनंद झाला. तो पुढेही चांगला खेळत राहावा अशी माझी इच्छा आहे”, अशा शब्दांत शाहरुख व्यक्त झाला.

डिसेंबर 2022 मध्ये ऋषभच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर पंतवर लिगामेंट सर्जरी करण्यात आली होती. हा अपघात इतका भीषण होता की त्याची कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर कारने खांबाला धडक दिली आणि ती पलटी झाली. अचानक पेट घेतलेल्या त्याच्या नव्याकोऱ्या कारचा या अपघातात कोळसा झाला होता.