
श्रेयस अय्यर सध्या टीम इंडियाच्या वेशीवर उभा असून त्याच्या कमबॅकची वाट पाहात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत डावललं गेलं. तसेच आशिया कप स्पर्धेतही विचार केला गेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यरचा विचार हा वनडे सामन्यांसाठी केला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरचे चाहते आणि त्याचा खेळा माहिती असलेले जाणकार नाराज झाले आहेत. आता श्रेयस अय्यरकडे इंडिया ए संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निवड होण्याची शक्यता वाढली आहे. पण ऐनवेळी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे चाहते चिंतेत आहे. दुसरीकडे आशिया कप स्पर्धेसाठी संघात निवडण्याचं कोणतंही दु:ख श्रेयस अय्यरला नाही. उलट त्याने आनंद व्यक्त केला ठआहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं बोलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..
श्रेयस अय्यरने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, ‘जेव्हा तुम्हाला माहिती असते की संघात असणं आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याच्या लायक आहात, तरीही तुम्ही बाहेर असाल तर दु:ख होतं. पण जेव्हा तुम्हाला माहिती असतं की, खेळाडू सतत चांगली कामगिरी करत आहे आणि ते टीमसाठी चांगलं करत आहेत. तर तुम्हाला त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. शेवटचा तुमचा हेतू टीम इंडियाला जिंकवण्याचा आहे. जेव्हा टीम जिंकत असते तेव्हा सर्व खूश असतात.’ श्रेयस अय्यरने असं सांगून चाहत्यांच्या वेदनांवर मलम लावला आहे. टी20 संघात निवडलेले खेळाडू चांगले खेळत असून यश मिळत असल्याचं श्रेयस अय्यरने मान्य केलं.
श्रेयस अय्यरच्या चाहत्यांना या महिन्यातच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण आशिया कप स्पर्धा सुरु असताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकांसाठी संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. कारण या स्पर्धेपूर्वी इंडिया ए संघाचा ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध सामना होणार आहे. या संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध पहिला सामना 16 सप्टेंबरपासून आणि दुसरा सामना 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.