रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरने षटकार मारत ठोकलं शतक, यासह इतिहासात केली नोंद

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात होत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसावर जम्मू काश्मीरने पकड मिळवली. यात मोलाचा हातभार राहिला तो शुभम पुंडीरचा...

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरने षटकार मारत ठोकलं शतक, यासह इतिहासात केली नोंद
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरचं षटकार मारत शतकी खेळी, यासह इतिहासात केली नोंद
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2026 | 6:23 PM

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत जम्मू काश्मीरने विक्रमांची मालिका सुरू केली आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. तसेच पहिल्या दिवसावरही मजबूत पकड मिळवली आहे. जम्मू काश्मीरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार पारस डोगरा याचा हा निर्णय योग्यच होता असं म्हणावं लागेल. कारण फलंदाजांनी कर्नाटकच्या गोलंदाजांना पहिल्या दिवशी रडवलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू काश्मीरने 2 गडी गमवून 284 धावा केल्या होत्या. यात शुभम पुंडीरने शतकी खेळी करत मोठा हातभार लावला. त्याने 221 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 117 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 52.94 चा होता. डावखुऱ्या शुभम पुंडीरचं शतकही खास राहिलं. त्याच्या शतकाची इतिहासात नोंद झाली आहे.

27 वर्षीय शुभम पुंडीर 185 चेंडूंचा सामना करत 94 धावांवर होता. खरं तर अशा स्थितीत एक दोन धावा काढून शतक पूर्ण करण्याचं फलंदाजाच्या डोक्यात असतं. पण शुभम पुंडीरने तसा काही विचार केल्याचं दिसलं नाही. त्याने 186व्या चेंडूचा सामना करताना षटकार मारला आणि शतक पूर्ण केलं. या शतकासह त्याने इतिहासात त्याच्या कामगिरीची नोंद केली आहे. कारण अंतिम फेरीत शतक ठोकणारा जम्मू काश्मीरचा पहिला फलंदाज ठरला आहे. शुभम पुंडीरचं रणजी ट्रॉफीतील दुसरं आणि फर्स्ट क्लास क्रिकेट कारकि‍र्दीतलं हे चौथं शतक आहे.

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीत शुभम पुंडीरची कामगिरी काही खास राहिली नव्हती.. त्याने या दोन सामन्यातील चार डावात फक्त 40 धावा केल्या होत्या. मात्र त्याने ही कसर अंतिम फेरीत भरून काढली आहे. पहिल्या दिवशी नाबाद 117 धावांवर तंबूत परतला आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी 200 धावा करण्याचं डोक्यात ठेवूनच उतरणार हे मात्र नक्की असणार आहे. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी जम्मू काश्मीरला मोठी धावसंख्या करावी लागणार आहे. कारण पहिल्या डावात आघाडी मिळाली आणि सामना अनिर्णित ठरला तर जेतेपदाची चव चाखता येईल.

Follow Us