
झिम्बाब्वे टी20 संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा याला नववर्षाआधीच वाईट बातमी मिळाली आहे. त्याच्या 13 वर्षीय छोटा भाऊ मोहम्मद महदी याचं निधन झालं आहे. त्याच्या निधनाची बातमी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने सोशल मिडिया पोस्ट करत दिली आहे. सिकंदर रजाच्या छोट्या भावाचं निधन 29 डिसेंबर 2025 रोजी हरारे येथे झालं. जन्मापासूनच तो हीमोफीलिया नावाच्या दुर्मिळ रक्त विकाराने ग्रस्त होता. त्याला रक्त गोठण्याचा त्रास व्हायचा. त्याने या आजाराशी जन्मपासून 13व्या वर्षापर्यंत लढा दिला. पण आरोग्यविषयक गुंता वाढत गेला आणि त्याने उपचारांना साथ देणं सोडलं. त्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. निधनाच्या दुसऱ्या दिवशी दिन वारेन हिल्स कबरस्तानात त्याचं दफनविधी पार पडला. झिम्बाब्वे क्रिकेटने एक पोस्ट करत कुटुंबाप्रती आपल्या संवेदना आणि दु:ख जाहीर केलं आहे. हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळावी आणि शांतीसाठी प्रार्थना करणारी पोस्ट शेअर केली.
दु:खद घटनेनंतर संघातील खेळाडू, चाहते आणि संपूर्ण क्रिकेट जगतातून रजा आणि त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना जाहीर केल्या आहेत. सिकंदर रझाचं क्रिकेट करिअर संघर्ष आणि यशाचं प्रतिक आहे. सिकंदर रजाने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतून संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिलं आहे. त्याने आयसीसी क्वालिफायर्समध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब जिंकला आहे. 2025 मध्ये रजाने आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रमवारीत जगातील नंबर 1 खेळाडू होण्याची किमया साधली आहे.
सिकंदर रजा झिम्बाब्वेसाठी 22 कसोटी, 153 वनडे आणि 127 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत त्याने 1434 धावा केल्या आहेत आणि 40 विकेट काढल्या आहेत. वनडे त्याने 4476 धावांपर्यंत मजल मारली आहेत तर 94 विकेट घेतल्या आहेत. टी20 सामन्यात 2883 धावा केल्या असून 102 विकेट काढल्या आहे. सिकंदर रजाचा फॉर्म पाहता जगभरातील क्रिकेट लीगमध्ये त्याला पसंती दिली गेली आहे. सिकंदर रजा आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे.