
Rekha Srivastava in a Shelter Home: मुंबईतील बेलापूर मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका वृद्ध महिला भीक मागत असताना दिसली. काही जणांनी तिला निवारा केंद्रात आणले. जेव्हा तिने तिची आपबित्ती सांगितली, तेव्हा सर्वच जण अवाक झाले. या महिलेला निवारागृहात अंघोळ घालण्यात आली. तिला नवीन कपडे देण्यात आले. त्यानंतर तिचे नाव आणि तिच्या पतीचे नाव विचारण्यात आले. तेव्हा अनेकांना धक्का बसला. या महिलेचे नाव रेखा श्रीवास्तव असे आहे आणि तिने माजी क्रिकेटर सलीम दुर्राणी यांची पत्नी असल्याचा दावा केला.
महिलेच्या दाव्यानुसार, तिचा अर्ध्याहून अधिक काळ हा मुंबईतच गेला आहे. ती काही वर्ष दुबईतही राहिली. ती एका विमान कंपनीची मालक होती. तिचे लग्न क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांच्याशी झाले होते. दुर्राणी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्या रस्त्यावर आल्या. काय आहे त्यामागील सत्य?
सलीम दुर्राणी हे माझे पती
रेखा श्रीवास्तव यांनी दावा केला आहे की प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि सिक्सर किंग सलीम दुर्राणी यांच्याशी तिचे लग्न झालेले आहे. ती त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी फिरायला गेली. त्यांच्या प्रत्येक सामन्यावेळी ती हजर होती. तिने त्यावेळी अनेक राजा-महाराजांच्या भेटी घेतल्या आहेत. गुजरातच्या महाराजांशी आपण भेटल्याची माहिती तिने दिली.
दुबईतही काही दिवस
रेखा श्रीवास्तवच्या दाव्यानुसार, ती दुबईतही सलीम दुर्राणी यांच्यासोबत राहत होती. तिने चांगले आयुष्य जगले. सुख आणि श्रीमंती तिच्या पायाशी लोळण घेत होते. ती एका विमान कंपनीची सहमालकही होती. पण आयुष्यात एकदम दुर्दैवी घटना घडली आणि तिचे आयुष्य पालटले. ती आर्थिकदृष्ट्या बरबाद झाली. ती बेघर झाली. तिला बंगला विकावा लागला.
सलीम दुर्राणी यांचे कुटुंबिय सध्या जामनगर येथे राहतात. त्यांच्याकडून या महिलेसंबंधीची कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांनी या महिलेला ओळखत असल्याचा कोणताही दावा केलेला नाही. काहींच्या मते रेखा श्रीवास्तव यांचे नाव सलीम दुर्राणी यांच्याशी संबंधित घडामोडीत आढळत नाहीत. सलीम दुर्राणी यांचे 2 एप्रिल 2023 रोजी निधन झाले. त्यावेळी ते जामनगर येथे त्यांच्या भावासोबत राहत होते.