
बांगलादेश क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि करो आणि मरो सामन्यात धमाका केला आहे. बांगलादेशने श्रीलंकेचा 83 धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवला आहे. बांगलादेशने यासह 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयाचं खातं उघडलं. बांगलादेशने श्रीलंकेसमोर 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेला बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. बांगलादेशने श्रीलंकेला 15.2 ओव्हरमध्ये गुंडाळलं आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
श्रीलंकेसाठी ओपनर पाथुम निसांका याने सर्वाधिक धावा केल्या. पाथुमने 29 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 32 रन्स केल्या. तर दासून शनाका याने 20 धावा केल्या. दोघे आले तसेच गेले. तर उर्वरित एकालाही श्रीलंकेसाठी दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. रिशाद हौसेन याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. शोरिफूल इस्लाम आणि मोहम्मद सैफुद्दीन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवली. तर मुस्तफिजूर रहमान आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी श्रीलंकेच्या प्रत्येकी 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशची स्थितीही श्रीलंकेपेक्षा काही वेगळी नव्हती. मात्र बांगलादेशच्या तिघांनी केलेल्या खेळीमुळे त्यांना 170 पार मजल मारता आली. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. बांगलादेशसाठी कर्णधार आणि विकेटकीपर लिटन दास याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. दासने 50 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह 76 धावा केल्या.
कुसल मेंडीस याने निर्णायक क्षणी रनआऊट करत शमीमच्या खेळीला ब्रेक लावला. शमीम हौसेन याने 27 बॉलमध्ये 177.78 च्या स्ट्राईक रेटने वादळी 48 धावा केल्या. शमीमने या खेळीत 2 सिक्सह 5 फोर ठोकले. तर तॉहिद हृदॉय याने 25 चेंडूत 31 धावा केल्या. बांगलादेशकडून या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेसाठी बी फर्नांडो याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर नुवान तुषारा आणि महीश तीक्षणा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
बांगलादेशकडून दुसऱ्या सामन्यात पलटवार
Skipper Litton Das puts in a shift with the bat as Bangladesh draw level in the T20I series against Sri Lanka 👏#SLvBAN 📝: https://t.co/PqHwjw3e9I pic.twitter.com/vy4t0aOp6m
— ICC (@ICC) July 13, 2025
दरम्यान दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला असल्याने तिसरा आणि अंतिम सामना चुरशीचा होणार हे स्पष्ट आहे. तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समसमान संधी आहे. तिसरा सामना हा सामना बुधवारी 16 जुलैला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.