
मुंबई | बहुप्रतिक्षित आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. वर्ल्ड कपआधी जोरदार सराव व्हावा, या उद्देशाने अनेक संघ हे द्विपक्षीय-त्रिपक्षीय एकदिवसीय मालिका खेळत आहेत. या दरम्यान काही खेळाडूंना दुखापत झालीय. तर काही खेळाडूंच्या आधीच्या दुखापतींनी डोकं वर काढलंय. वर्ल्ड कपच्या तोंडावर टीममधील प्रमुख आणि महत्त्वाचे खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात सापडल्याने टीम मॅनेजमेंटचंही टेन्शन वाढलंय. अशातच क्रिकेट विश्वातून वाईट बातमी समोर आली आहे.
ज्याची भीती होती तेच झालंय. टीमचा स्टार खेळाडू हा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिका टीमचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्तजे हा दुखापतीमुळे आयसीसी वर्ल्ड कप 2023 मधून आऊट झालाय. ऐन महत्त्वाच्या स्पर्धेच्या काही दिवसांआधी एनरिक दुखापतीमुळे बाहेर झाल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत सापडलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनरिकला लोअर बॅक इंजरीचा त्रास आहे. या दुखापतीमुळेच एनरिक बाहेर पडला आहे. दुर्देवाची बाब म्हणजे एनरिकला दुखापतीमुळे 2019 वर्ल्ड कपमध्येही खेळता आलं नव्हतं. त्यात आता पुन्हा 2023 वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याने एनरिकसाठीही हा मोठा धक्का आहे.
त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका टीम मॅनेजमेंट एनरिकच्या जागी कुणाला संधी देतेय, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र एनरिच बाहेर झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानंतर काही मिनिटांनीच दक्षिण आफ्रिका टीमची 5 सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. टेम्बा बावुमा हा वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका टीमचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 7 ऑक्टोबर रोजी श्रीलंका विरुद्ध खेळणार आहे. हा सामना दिल्लीत पार पडणार आहे.
आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम साऊथ आफ्रिका | टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी आणि रॅसी वन डेर डुसेन.