
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली. कर्णधार चरिथ असलंकाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 50 षटकात 6 गडी गमवून 271 धावा केल्या. तसेच विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं इंग्लंडला काही जमलं नाही. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. पण हाती काही विजय लागला नाही. इंग्लंडने 49.2 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. हा सामना इंग्लंडने 19 धावांनी गमावला. इंग्लंडला 12 चेंडूत 34 धावांची गरज होती. 19व्या षटकात इंग्लंडच्या जेमी ओव्हरटनने आक्रमक फटकेबाजी केली. चौकार षटकार मारत 13 धावा काढल्या. तसेच एका वाइडसह 14 धावा आल्या. शेवटच्या षटकातील सहा चेंडूत 20 धावांची गरज होती. जेमी ओव्हरटनच स्ट्राईकला होता. पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर फटका मारला पण झेलबाद झाला. श्रीलंकेने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेकडून पाथुम निसंक्का आणि कमिल मिशाराने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 50 धावांची भागीदारी केली. पाथुम निसंक्का 21, कमिल मिशारा 27 धावा करून बाद झाले. तर कुसल मेंडिसने चांगली खेळी केली. त्याने 117 चेंडूत नाबाद 93 धावा काढल्या. पण त्याला काही षतक पूर्ण करता आलं नाही. षटकं संपल्याने 7 धावा करता आल्या नाहीत. तर जनिथ लियांगेने 53 चेंडूत 46 दावा केल्या. या व्यतिरिक्त मोठी धावसंख्या कोणालाही करता आली नाही.
इंग्लंडला 271 धावांचा पाठलाग करताना संघाच्या 12 धावा असताना पहिली विकेट पडली. झॅक क्राउली 6 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर बेन डकेट आणि जो रूट यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. त्यामुळे हा सामना श्रीलंकेच्या हातून निसटतो की काय असं वाटत होतं. पण ही जोडी फुटली आणि इंग्लंडच्या हातून सामना गेला. कारण त्यानंतर आलेल्या फलंदाजांना तग धरून खेळता आलंच नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखा डाव कोसळला. जेमी ओव्हरटनने शेवटी काही फटकेबाजी केली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही.