
दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर गतविजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा धुव्वा उडवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला. त्यानंतर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीला सुरुवात झाली. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 17 जूनपासून सुरुवात झाली. पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. त्यानंतर आता दुसरा आणि अंतिम सामना हा बुधवार 25 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे.
उभयसंघातील पहिला सामना 17 ते 21 जून दरम्यान गॉलमध्ये खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांत चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी पहिल्या डावात 450 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र सरतेशेवटी सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे 2 सामन्यांची मालिका 0-0 ने बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांचा 25 जूनपासून सुरु होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर नाव कोरण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो येथे होणार आहे.
दोन्ही संघांची ही WTC स्पर्धेच्या इतिहासातील चौथ्या साखळीतील पहिलीच मालिका आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळू शकते. बांगलादेशकडे श्रीलंकेला त्यांच्याच घरात नमवण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसमोर मालिका न गमावण्याचं काहीअंशी आव्हान असणार आहे. आता यात कोण यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
स्टेडियममध्ये मोफत प्रवेश
Sri Lanka Cricket wishes to inform you that entry to the 2nd Test Match between Sri Lanka and Bangladesh at the SSC Ground,
Colombo, will be open to the public free of charge.The public can enter the stadium through Gate Nos. 03 and 04 to witness the match.
The 2nd Test Match… pic.twitter.com/IpMrGoIU7z
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 23, 2025
क्रिकेट चाहते श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना फुकटात पाहू शकतात. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये फ्री एन्ट्री ठेवली आहे. क्रिकेट चाहत्यांना गेट नंबर 3 आणि 4 मधून प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती श्रीलंका क्रिकेट या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्याला मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते उपस्थित राहू शकतात.