
भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याने इंग्लंडमध्ये कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून अफलातून सुरुवात केली आहे. पंतने लीड्समधील सामन्यात डबल धमाका केला आहे. पंतने एकाच सामन्यातील सलग दुसऱ्या डावातही शतक झळकावलं आहे. पंतच्या या शतकानंतर स्टेडियमध्ये उपस्थित भारतीय क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भारताचे दिग्गज आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी हवेत दोन्ही हात फिरवून पंतकडे ट्रेडमार्क सेलिब्रेशन करण्याची मागणी केली. मात्र पंतने ही मागणी फेटाळली आणि पुढच्या वेळेस नक्की करु, असं इशाऱ्यात म्हटलं. गावसकरांनी नक्की काय मागणी केली हे सविस्तर जाणून घेऊयात.
पंतने लीड्समध्ये दुसऱ्या दिवशी या सामन्यातील पहिलं वैयक्तिक शतक केलं. पंतने एकहाती षटकार खेचत शतक झळकावलं. पंतने त्यानंतर मैदानात कोलांटउडी मारत शतक साजरं केलं. पंतच्या या ट्रेडमार्क सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. गावसकरांनी तेव्हा कॉमेंट्रीबॉक्समधून “सुपर्ब सुपर्ब सुपर्ब” म्हणत पंतच्या या खेळीचं तोंडभरून कौतुक केलं. पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बेजबाबदार शॉट मारुन आऊट झाला होता. तेव्हा गावसकरांनी स्टुपिड स्टुपिड स्टुपिड असं म्हटलं होतं. त्यामुळे गावसकरांचं आता “सुपर्ब सुपर्ब सुपर्ब” असं म्हणणं पंतसाठी उल्लेखनीय बाब ठरली.
त्यानतंर ऋषभ पंत याने सामन्यातील चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात शतक केलं. यावेळेस सुनील गावसकर रवी शास्त्री यांच्यासह सामन्याचा आनंद घेत होते. गावसकरांनी पंतकडे पाहत त्याला पुन्हा कोलांटउडी मारण्यास इशाऱ्याने सांगितलं. मात्र पंतने मैदानातूनच इशाऱ्याद्वारे “आता जमणार नाही, पुढच्या वेळेस नक्की करु”, असं इशाऱ्याने सांगितलं.
गावसकर आणि पंत यांच्यात इशाऱ्यात काय झालं?
𝐓𝐡𝐞 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐰𝐢𝐜𝐤𝐞𝐭-𝐤𝐞𝐞𝐩𝐞𝐫 𝐭𝐨 𝐬𝐦𝐚𝐬𝐡 𝐭𝐰𝐢𝐧 𝐜𝐞𝐧𝐭𝐮𝐫𝐢𝐞𝐬 𝐢𝐧 𝐚 𝐓𝐞𝐬𝐭 𝐦𝐚𝐭𝐜𝐡! 🙌🏻
Take a bow, @RishabhPant17, brilliant would be an understatement! 🫡🔥#ENGvIND 1st Test Day 4 LIVE NOW Streaming on JioHotstar 👉… pic.twitter.com/4A1Poe5jbC
— Star Sports (@StarSportsIndia) June 23, 2025
पंतने पहिल्या डावात 178 चेंडूत 75.28 च्या स्ट्राईक रेटने 134 धावा केल्या. पंतने या खेळीत 6 षटकार आणि 12 चौकार लगावले. तर पंतने दुसऱ्या डावात 84.29 च्या स्ट्राईक रेटने 140 बॉलमध्ये 118 रन्स केल्या. पंतने या दरम्यान 3 सिक्स आणि 15 फोर लगावले. तसेच केएल आणि पंत या जोडीने दुसऱ्या डावात चौथ्या विकेटसाठी 195 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यानंतर पंत आऊट झाला. पंत आऊट झाला तोवर भारताच्या खात्यात 293 धावांची आघाडी होती. आता टीम इंडिया दुसरा डाव किती धावांवर घोषित करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्यानंतर इंग्लंडला 465 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाला 6 रन्सची लीड मिळाली.