हॉटेल रूममध्ये बसू नका..! पिंक बॉल कसोटीत दारूण पराभव झाल्यानंतर सुनील गावस्कर भडकले

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला पिंक बॉल कसोटी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवामुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी त्यांनी रोहित शर्माला धारेवर धरलं होतं. मालिकेत मधेच आला की टीम डिस्टर्ब होईल असं सांगितलं होतं.

हॉटेल रूममध्ये बसू नका..! पिंक बॉल कसोटीत दारूण पराभव झाल्यानंतर सुनील गावस्कर भडकले
Sunil Gavaskar
| Updated on: Dec 08, 2024 | 5:32 PM

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात विजयाने केली होती. रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारताचं नेतृत्व जसप्रीत बुमराहने केलं होतं. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दणदणीत विजयाची नोंद केली होती. दुसऱ्या कसोटी सामना खेळण्यासाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहोचला आणि संघाची धुरा त्याच्या खांद्यावर आली. पण पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाला विजयाऐवजी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 10 विकेट राखून पराभूत केलं. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या पराभवानंतर टीम इंडियाला खडे बोल सुनावले आहेत. दुसऱ्या कसोटीचा निकाल अडीच दिवसातच लागला आहे. हाच धागा पकडून तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाकडे अतिरिक्त वेळ असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करायला हवा. खेळाडूंनी हॉटेल रूममधून बाहेर यायला हवं.

सुनील गावस्कर यांनी ब्रॉडकास्टर्सची बोलताना सांगितलं की, ‘उरलेल्या मालिकेकडे तीन सामन्यांची मालिका म्हणून पाहिलं पाहीजे. जे काही झालं ते विसरून जा. मला असं वाटतं की टीम इंडियाने उरलेल्या अतिरिक्त वेळेत सराव केला पाहीजे. ही बाब खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही हॉटेल रूममध्ये बसू शकत नाहीत. तुम्ही येथे खेळण्यासाठी आले आहात आणि तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्हाला पूर्ण दिवस सराव करण्याची गरज नाही. पण सकाळी किंवा दुपारी किंवा जी वेळ असेल तेव्हा सराव करू शकता. पण हे दिवस वाया घालवू नका. जर हा कसोटी सामना पाच दिवस चालला असता तर तुम्ही पाच दिवस खेळले असते.’

सरावाच्या पर्यायाबाबत सुनील गावस्कर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘सराव करायचा की नाही याचा निर्णय घेण्याचा हक्क प्रशिक्षक आणि कर्णधाराकडे असायला हवा. प्रशिक्षकाने जर सांगितलं की 150 धावा केल्यात आता सरावाला येण्याची गरज नाही किंवा 40 षटकं टाकली आता सराव नको करू.  खेळाडूंना असे पर्याय देण्याची गरज नाही. जर तु्म्ही खेळाडूंना पर्याय दिला तर त्यापैकी अधिक खेळाडू हॉटेलच्या खोलीतच राहणं पसंत करतील.’