
वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील गुणतालिकेत टॉप 2 मध्ये राहण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंड दौरा गाजवला होता. पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. आता पुन्हा एकदा दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकण्याचं आव्हान आहे. 2 ऑक्टोबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून या आठवड्यात संघाची घोषणा केली जाईल. या कसोटी मालिकेसाठी बहुतांश खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे. पण इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंना डावललं जाण्याची शक्यता आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय निवड समिती फक्त 15 खेळाडू निवडणार असल्याचं कळत आहे.
भारतीय कसोटी संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखालील 15 खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल जोडी सलामीला उतरेल. तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनचा विचार केला जाईल. इंग्लंड दौऱ्यात काही खास केलं नसलं तरी त्याच्या नावाचा विचार या मालिकेत केला जाईल. ऋषभ पंत दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या ध्रुव जुरेल घेऊ शकतो. फिरकीपटूची जबाबदारी रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेलचा विचार केला जाईल. वेगवान गोलंदाजीचा धुरा मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीपच्या खांद्यावर असेल.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंगचा विचार केला जाऊ शकतो. करुण नायर टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवेल की नाही याबाबत शंका आहे. त्याच्या ऐवजी नितीश कुमार रेड्डी किंवा श्रेयस अय्यरचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील टीममध्ये किती बदल असेल हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. कोण आत आणि कोण बाहेर याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना खूप सारे पर्याय असल्याने खेळाडूंची निवड करणं वाटतं तितकं सोपं नाही.