टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी, सुपर 8 फेरीच्या तीन सामन्यात भारताच्या नशिबी हे पंच
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार सुरु झाला आहे. 8 संघांमध्ये उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी चुरस असणार आहे. भारताचे तीन सामने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियासोबत आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने पंचांची घोषणा केली आहे. भारताच्या सामन्यात कोण पंच असेल ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता रंगतदार वळणावर आला आहे. सुपर 8 फेरीतील प्रत्येक सामन्यानंतर उलथापालथ होताना दिसणार आहे. आठ पैकी कोणते चार संघ उपांत्य फेरी गाठणार याची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे, चाहत्यांच्या लकी अनलकी या गोष्टींवर विश्वास असतो. त्यामुळे काही ना काही वावड्या उडत असतात. अशा स्थितीत सुपर 8 फेरीसाठी पंचांची घोषणा केली आहे. यात काही पंचांनी नावं पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण या आधीही या पंचांनी पंचगिरी केली होती आणि टीम इंडियाला चाहत्यांच्या भाषेत सांगायचं तर अनलकी ठरले होते. यापैकी रिचर्ड कॅटलबरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांचं नाव ऐकून भारतीय क्रीडारसिकांना घाम फुटला आहे. नेमके हे दोन पंच भारत ऑस्ट्रेलिया या सामन्यात पंचगिरी करणार आहेत. कॅटलबरो हे कायम ऑस्ट्रेलियासाठी लकी ठरले आहेत.
आयसीसी स्पर्धांमध्ये कॅटलबरो हे पंच असले की ऑस्ट्रेलियासोबत लक जातं असं चाहत्यांचं म्हणणं आहे. आकडेवारीवरूनही असंच म्हणावं लागेल. 2015 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीपासून ते 2023 वनडे वर्ल्डकपपर्यंत असंच झालं आहे. 2015 वर्ल्डकप स्पर्धेत कॅटलबरो हे पंच होते आणि तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली होती. याच वर्ल्डकपमध्ये कॅटलबरो पंच म्हणून अंतिम फेरीत लाभले आणि ऑस्ट्रेलियाने किताब जिंकला. 2021 टी20 वर्ल्डकप फायनलमध्येही असंच झालं. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाचं नशिब उघडलं. त्यामुले कॅटलबरो यांचं नाव ऐकून चाहत्यांची अस्वस्थता वाढली आहे. सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलियाला लक फॅक्टर साथ देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
खरं तर टीम इंडियाला सुपर 8 फेरीतील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. तर आणि तरंच उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होईल. अर्थात अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत करावं लागेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला कॅटलबरो पंच असूनही पराभूत केलं तर मग यंदा लक आपल्या बाजूने आहे असं म्हणायला हरकत नाही.
20 जून: अफगाणिस्तान विरुद्ध भारत (बार्बाडोस) सामनाधिकारी: डेव्हिड बून मैदानी पंच: रॉडनी टकर आणि पॉल रीफेल टीव्ही अंपायर: अल्लाउदीन पालेकर चौथा पंच: ॲलेक्स व्हार्फ
22 जून: भारत विरुद्ध बांगलादेश (अँटिगा) सामनाधिकारी: रंजन मदुगले मैदानी पंच: मायकेल गफ आणि ॲड्रियन होल्डस्टॉक टीव्ही पंच: लँगटन रुसेरे चौथे पंच: रिचर्ड केटलबोरो
24 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (सेंट लुसिया) सामनाधिकारी: जेफ क्रो मैदानी पंच: रिचर्ड केटलबरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ टीव्ही अंपायर: मायकेल गॉफ चौथा पंच: कुमार धर्मसेना
