
टीम इंडियाचा साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंडिया सुपर 8 मध्ये खेळणार आहे. टीम इंडिया एका बाजूला सुपर 8 ची तयारी करतेय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत टीम इंडियाचा सलामीवीर आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी राखीव असलेला शुबमन गिलचे खटके उडाल्याचं म्हटलं जात होतं. अशात आता शुबमन गिलने या प्रकरणारवर रोहितसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत भाष्य केलं आहे.
शुबमनने रोहितसोबतचा फोटो इंस्टा स्टोरीत पोस्ट केला आणि दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला. शुबमनच्या इंस्टा स्टोरीत, रोहित शर्मा आणि शुबमन गिल दोघे एका शिपवर आहेत. तसेच रोहितची मुलगी समायराही आहे. शुबमनने या इंस्टा स्टोरीत असं काही लिहिलंय ज्यामुळे रोहित आणि त्याच्यासोबत असलेल्या नात्याबाबत सर्व चित्र स्पष्ट झालंय.
इंस्टा स्टोरीमुळे शुबमन आणि रोहित या दोघांमध्ये ऑल इज वेल असल्याचं स्पष्ट झालं आहे. “मी आणि सॅमी, रोहितकडून शिस्तीचे धडे घेतोय”, असं शुबमन कॅप्शनमध्ये म्हटलंय. शुबमनच्या या वाक्याने दोघांमध्ये असलेल्या वादाची चर्चा ही अफवाच ठरली आहे. शुबमन गिलने शिस्तभंग केल्याने त्याला मायदेशी पाठवल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. याबाबत टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनीही प्रतिक्रिया देत विषय संपवलाय.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली तेव्हाच पहिल्या टप्प्यानंतर राखीव असलेल्या शुबमन गिल आणि आवेश खान मायदेशी परतणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र सोशल मीडियावर शुबमन गिलने शिस्तभंग केल्याने कॅप्टन रोहितने त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मात्र तसं काहीच नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान आता खलील अहमद आणि रिंकू सिंह हे दोघेच टीम इंडियाच्या मुख्य संघासह राखीव खेळाडू म्हणून सोबत असणार आहेत.
शुबमन गिलची इंस्टा स्टोरी
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.