
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यजमान यूएसए आणि टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे दोन्ही संघात या सामन्यात जोरदार चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 5 भारतीय टीम इंडियाची सुपर 8 ची वाट रोखू शकतात, ते 5 भारतीय कोण आहेत? जाणून घेऊयात.
यूएसए टीमकडून खेळणाऱ्या 5 खेळाडूंचा जन्म भारतात झाला आहे. यूएसए टीमचा कॅप्टन मोनांक पटेल हा मुळ गुजरातचा आहे. मोनांक पटेलच्या नेतृत्वात यूएसएने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यूएसएने विश्वविजेत्या पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये मात करत विजय मिळवला. तर त्याआधी कॅनडाला पराभूत करत विजयी सलामी दिली. मोनांक पटेल व्यितिरिक्त 4 भारतीय कोण आहेत, ते पाहुयात.
मिलिंद कुमार याचा जन्म राजधानी दिल्लीत झालाय. निसर्ग पटेल मुळ गुजरातचा आहे. तर हरमीत सिंह आणि सौरभ नेत्रवाळकर हे दोघेही मुंबईकर आहेत. इतकंच नाही, तर या दोघेही टीम इंडियाकडून 2010 साली अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले आहेत. तसेच देशांतर्गत स्पर्धेतही दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हरमीत सिंह आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलाय. तर मिलिंद कुमारने रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीचं प्रतिनिधित्व केलंय. तसेच आयपीएलमध्ये दिल्ली आणि बंगळुरुसाठी खेळलाय.
कॅप्टन मोनांक पटेल याने याआधीच्या 2 सामन्यात 33 च्या सरासरीने एका अर्धशतकासह 66 धावा केल्या आहेत. तर सौरभ नेत्रवाळकरने यूएसएला पाकिस्तान विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला. सौरभने आतापर्यंत या स्पर्धेत 2 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याचा इकॉनॉमी रेट हा 5.66 इतका आहे.
युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.